तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कॅबिनेट मंजुरीची जबाबदारी माझी - सुनील शेळके
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:18 IST2025-01-24T12:18:26+5:302025-01-24T12:18:57+5:30
या महामार्गाचे प्रस्तावित कामासाठी राज्य शासनाने वस्तू व सेवा कर, मुद्रांक शुल्क तसेच गौण खनिज वापराबाबत सवलत द्यावी

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कॅबिनेट मंजुरीची जबाबदारी माझी - सुनील शेळके
वडगाव मावळ : प्रस्तावित तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डीच्या कामाच्या मसुदा एमएसआयडीसीकडून महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांमार्फत मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठविला आहे, अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाविषयीआमदार शेळके, खेडचे आमदार बाबाजी काळे आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे (एमएसआयडीसी) व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे, उपाध्यक्ष दिलीप डोळस, सचिव अमित प्रभावळकर, सदस्य संजय चव्हाण, प्रमोद दाभाडे यांची एमएसआयडीसीच्या मुंबईतील नरिमन पॉइंट येथील कार्यालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
आमदार शेळके म्हणाले, ‘आगामी कॅबिनेटच्या बैठकीत तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाच्या मसुद्याला तत्काळ मंजुरी द्यावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहे. कॅबिनेट मंजुरीची जबाबदारी माझी आहे.’
बैठकीत एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले, तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाचे प्रस्तावित कामासाठी राज्य शासनाने वस्तू व सेवा कर, मुद्रांक शुल्क तसेच गौण खनिज वापराबाबत सवलत द्यावी, यासंदर्भात एमएसआयडीसीकडून गेल्या १ जानेवारी रोजी प्रारूप मसुदा कॅबिनेटच्या मंजुरीसाठी पाठविला आहे.