पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करून त्याद्वारे त्यांचा स्वीय सहायक (पी.ए.) बोलत असल्याचे भासवून बांधकाम व्यावसायिकाला धमकावून २० लाखांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. त्यातील दोन लाख घेण्यासाठी आलेल्या ६ जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. बांधकाम व्यावसायिक अतुल जयप्रकाश गोयल (वय ४७, रा. वानवडी) यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
यापूर्वीही फसवणुकीचे प्रकार
यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने अनेकांना फोन करून लाखो रुपये उकळण्यात आले होते. पुणे पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली होती. त्यांनी पुणे, पिंपरीतील किमान १० ते १२ जणांची फसवणूक केल्याचे उघड झाले होते. खासदार अमोल कोल्हेंच्या नावाने एका बिल्डरकडेही निधीची मागणी करण्यात आली होती.