पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’ तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमांपाठोपाठ आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ‘प्रश्न तुमचे, उत्तर कुलगुरूंचे’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून थेट उत्तरे देणार आहेत. एखाद्या विद्यापीठाच्या कुलगुरूंनी रेडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची थेट संवाद साधण्याचा हा पहिलाच कार्यक्रम ठरला आहे. शुक्रवारी या कार्यक्रमाचे पहिले ध्वनिमुद्रण झाले.मागील काही दिवसांपासून विद्यापीठात विविध प्रश्नांवर विद्यार्थी संघटनांकडून सातत्याने आंदोलने करण्यात आली आहेत. त्यामध्ये परीक्षा विभागासह वसतिगृह, भोजनालय यांसह विविध मुद्यांवरून संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. विद्यापीठ आवारासह पुणे, अहमदनगर व नाशिक मधील संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही विविध अडचणींना सामोरे जावे लागते. यापार्श्वभूमीवर डॉ. नितीन करमळकर यांनी कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून विद्यार्थ्यांशी थेट संवादाचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे ते स्वत:हून विदयार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी उत्सुक असतात. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठातील ‘विद्यावाणी’ कम्युनिटी रेडिओचा उपयोग केला जाणार आहे. या रेडिओवर दर महिन्याला ‘प्रश्न तुमचे, उत्तर कुलगुरूंचे’ हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थी कुलगुरूंना प्रश्न विचारतील. त्याची उत्तरे कुलगुरू देतील. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे ध्वनिमुद्रण शुक्रवारी पूर्ण झाले. या कार्यक्रमाचा पहिला भाग दि. १ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता प्रसारित होणार आहे. त्याचे पुन:प्रसारण त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. हा कार्यक्रम ‘एफएम बँड १०७.४ मेगाहर्ट्झ’वर ऐकायला मिळेल.पहिल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘कमवा व शिका योजना’, कॅम्पस इंटरव्ह्यूव्ह, जयकर ग्रंथालयातील प्रकाशयोजना, विद्यापीठातील सुरक्षितता, देशातील शिक्षणपद्धती अशा विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारले होते. त्याला डॉ. करमळकर यांनी सविस्तर उत्तरे दिली. या संवादातून विद्यार्थ्यांशी संबंधित काही प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. कुलगुरूंकडून यापुढे दर महिन्याला अशाप्रकारे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. कुलगुरूंना प्रश्न विचारण्यासाठी विद्यार्थ्यांना काही दिवस आधी सांगितले जाईल. याबाबत विद्यापीठाकडून अधिकृतपणे माहिती दिली जाणार आहे. कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण होण्याआधी काही दिवस विद्यार्थ्यांना आपल्या मनातील प्रश्न कुलगुरूंना पाठविता येतील.
विद्यार्थी हा विद्यापीठाचा केंद्रबिंदू आहे. त्यांना भेडसावणार्या अडचणी तातडीने सोडविणे याला मी विशेष महत्त्व देतो. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे हे माझे प्राधान्य आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या ‘विद्यावाणी’ या कम्युनिटी रेडिओद्वारे मी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणार आहे. यातून त्यांच्यासमोर असलेल्या अनेक प्रश्नांची माहिती होते आणि ते सोडवणे सोपे जाते. महिन्यातून एकदा संवाद साधला जाणार आहे. याशिवायही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे वेगवेगळे मार्ग मी अवलंबणार आहे.- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ