बारामती : दत्तामामा बांधकाम खात्याचा राज्यमंत्री आहे. बांधकाम खात्याच्या चाव्या त्याच्या हातात आहेत. मात्र या राज्याचा वित्तमंत्री मी आहे. त्यामुळे तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. मीच ती ओपन केली नाही तर काय घंटा मिळणार, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना चिमटा काढला. निंबुत (ता. बारामती) येथे रविवारी (दि. 27) एका उद्घाटन कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
पवार म्हणाले, संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग या दोन महामार्गांना जोडणारा निरा-बारामती रस्ता महत्त्वाचा आहे. बांधकाम खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे येथे उपस्थित आहेत. दत्तामामा तुम्ही नुसता इंदापूर तालुक्याकडे लक्ष देऊ नका. मला देखील या बाबाला विनंती करावी लागते आमच्या तालुक्यातील रस्त्यांना देखील निधी द्या. अशी मिश्किल टिप्पणी करत अजित पवार पुढे म्हणाले, बांधकाम खात्याच्या चाव्या जरी दत्तामामा च्या हातात असल्या तरी वित्तमंत्री म्हणून तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. मीच निधी दिला नाही तर घंटा मिळणार, अजित पवार यांच्या या अनपेक्षीत वारामुळे व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे चांगलेच गोंधळले. तर सभागृहात देखील हास्यकल्लोळ उडाला.