पुणे : ‘‘माझी ही अकरावी निवडणूक होती. प्रत्येक वेळी मतदान झाल्यानंतर मी कार्यकर्त्यांबरोबर बोलून किती मते मिळणार याचा अंदाज घेत असतो. यावेळी मताधिक्याचा माझा अंदाज ११ हजार मतांनी कमी आला,’’ असे पुण्याचे नव्याने निवडून आलेले खासदार गिरीश बापट यांनी सांगितले. ‘‘विरोधी उमेदवाराने माझ्यावर नको ती टीका का केली, मी मात्र कधीही कमरेखालची टीका केली नाही, त्यामुळेच मताधिक्य मिळाले,’’ या शब्दांत बापट यांनी त्यांना मिळालेल्या विक्रमी मताधिक्याचे रहस्यही उलगडले.
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी (दि. ४) बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून आता देशाच्या सर्वोच्च सभागृहात काम करायला मिळणार असल्याचा आनंद असल्याचे बापट यांनी सांगितले.
आगामी नियोजनाबद्दल बापट म्हणाले, की निवडणूकीआधी पुणे शहराचा म्हणून पक्षाने जाहीर केलेल्या संकल्पपत्रातील सर्व कामांसाठी कटीबद्ध आहे. मेट्रो, चांदणी चौक उड्डाणपूल अशी अनेक कामे सुरूच आहेत. आता पुणे शहराचे पाणी तसेच वाहतूक या समस्यांकडे लक्ष देणार आहे. खासदार म्हणून शहरासाठी जे करता येणे शक्य आहे ते करणार आहे, असे ते म्हणाले. भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी घेतलेल्या अविश्रांत परिश्रमांमुळेच माझा विजय शक्य झाला. महापालिकेतील पदाधिकारी सक्षम आहेत. त्यांना बरोबर घेऊन पुण्याच्या प्रश्नांवर काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आता कसबा विधानसभेतील भाजपाचा आगामी उमेदवार कोण, या प्रश्नावर बापट म्हणाले, ‘‘येत्या १५ दिवसात मी राजीनामा देईन. त्यानंतर पालकमंत्री कोणाला नियुक्त करायचे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. कसब्याच्या उमेदवारीसाठी आमच्याकडे माझ्यापेक्षाही चांगल्या अनेक व्यक्ती आहेत. त्यामुळे कसबा कोण लढवणार हा प्रश्नच नाही. पक्षश्रेष्ठी ते ठरवतील.’’ जिल्ह्यातल्या बारामती आणि शिरूर हे दोन मतदारसंघ भाजपाला गमवावे लागले. या संदर्भात बापट म्हणाले, की पुण्यात जसे कसबा, कोथरूड, पर्वती हे भाजपाचे बालेकिल्ले झाले आहेत, तसे बारामतीचे आहे. तो ‘त्यांचा’ बालेकिल्ला आहे. मात्र आम्ही प्रयत्न सोडणार नाही. जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी मीसुद्धा उमेदवार होतो, त्यामुळे बारामतीत हवा तसा वेळ देता आला नाही, मात्र आम्ही बारामती पुन्हा लढणार व जिंकणारही.’’समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार विजय काळे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, जगदीश मुळीक, पालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, मुरलीधर मोहोळ आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्रीपदाचा राजीनामा देणार ‘‘येत्या पंधरा दिवसात पालकमंत्रीपद आणि राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहे. नवे पालकमंत्री कोण असतील, याची चिंता नाही. पक्षश्रेष्ठी तो निर्णय घेतील.'' -खासदार गिरीश बापट.