पुणे : टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपेला अटक करून निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्याच्या घर आणि कार्यालयातील छापेमारीत कोट्यावधींचे घबाडही सापडले. हा घोटाळा उघड झाल्यापासून सुपे तणावात असल्याची माहिती त्याचे वकील मिलिंद पवार यांनी दिली आहे. तर सुपे याने मला आत्महत्या करावीशी वाटते, असा इशाराही दिला आहे. ''तर टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी मला बळीचा बकरा बनवलं जातंय. मला जाणूनबुजून टार्गेट केलं जात असून या सगळ्याचा मनःस्ताप होत असल्याचे सुपे यावेळी म्हणाला असल्याचे पवार यांनी सांगितले. सुपेच्या कुटुंबातील लोकांनाही आरोपी करणार असल्याची पुणेपोलिसांची तयारी आहे. 2017 मध्ये ज्या कंपन्या होत्या, त्यांनाच कामे दिली होती. मात्र या सगळ्यात मला बळीचा बकरा बनवलं जात आहे, अशी प्रतिक्रिया सुपेने दिल्याचे मिलिंट पवार म्हणाले सांगितले आहेत.''
मुलगी आणि जावयाकडे दिलेल्या बॅगेत आढळले होते १ कोटी
राज्य परीक्षेचा आयुक्त तुकाराम सुपे याने मुलगी व जावयाकडे दिलेल्या बॅगा जप्त केल्या असून त्यात तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांची रोकड तसेच एकूण ४४ वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असा जवळपास २ कोटी रुपयांहून अधिकचा ऐवज जप्त केला होता. तपासात सापडलेल्या दागिन्यांचे मुल्यांकन सोनारांमार्फत करण्यात आले होते.
तुकाराम सुपे याच्या घरी ८८ लाख रुपयांची रोकड, दागिने असा ९६ लाख
घरी दुसऱ्यांदा टाकलेल्या धाडीमध्ये २ कोटी रुपयांची रोकड, दागिने सापडले असून पोलिसांनी जप्त केले होते. तुकाराम सुपे याला पोलिसांनी पकडल्याचे समजल्यानंतर त्याच्या पत्नीने हा ऐवज मेव्हणाकडे दिला होता. पोलीस चौकशीत ही माहिती पुढे आल्यानंतर पोलिसांनी १ कोटी ९८ लाख रुपयांची रोकड व दागिने जप्त केले आहेत. याअगोदर तुकाराम सुपे याच्या घरातून ८८ लाख रुपयांची रोकड, दागिने, ५ लाख ५० हजारांच्या ठेवी असा ९६ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला होता.
सुपे आणि सावरीकर यांच्या पोलीस कोठडीमध्ये ३० डिसेंबरपर्यंत वाढ
न्यायालयाने सुपे आणि सावरीकर यांच्या पोलीस कोठडीमध्ये ३० डिसेंबरपर्यंत वाढ केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जी. डोलारे यांनी हा आदेश दिला. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणामध्ये सुपे व सावरीकर यांच्यासह अन्य सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आतापर्यंत 3 कोटी 90 लाख जप्त केले
तुकाराम सुपे यांच्या घरी, कार्यालयांमध्ये पुणे पोलिसांनी केलेल्या छापेमारी मध्ये आत्तापर्यंत 3 कोटी 15 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. तर दीड किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त केलेली रोकड आणि सोन्याचे दागिने एकूण 3 कोटी 90 लाख इतके आहे.