प्रकाश शेलार
केडगाव : 'देलवडी तालुका दौंड येथे देलवडी ग्रामस्थ व ‘एक मित्र एक वृक्ष’ संघटनेने देलवडी तालुका दौंड गावांमध्ये वृक्षारोपणाची चळवळ आणून उजाड माळरानावर तब्बल सहाशे देशी औषधी झाडे लावून माळरानावर नंदनवन फुलवलं आहे. ही झाडे लावण्यासाठी तब्बल चार लाख रुपयांची लोकवर्गणी गोळा करून जिल्ह्यामध्ये एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. तसेच अवघी चार हजार लोकसंख्या असलेल्या गावाने चार लाख रुपये लोकवर्गणी गोळा करून नवा आर्दश घालून दिला आहे. गावातील खंडोबा मंदीर हे जेजुरीच्या खंडोबा मंदीराची हूबेहूब प्रतिकृती असल्याने त्यांला प्रतिजेजुरी संबोधले जाते. झाडांसाठी ४ लाख रुपये जमा करणारे देलवडी हे महाराष्ट्रातील पहिले गाव म्हणावे लागेल. राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व गाव या अभियानात सहभागी झाले आहे. सरपंच निलम काटे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या उपक्रमासाठी मोफत खड्डे, माती व पाईप उपलब्ध केले. एक मित्र एक वृक्ष संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मुथा यांनी देलवडी गावामध्ये वृक्षारोपण चळवळ आणली. झाडांसाठी ट्री गार्ड व ठिबक करण्यात आले. आईचं बन असल्यामुळे प्रत्येक ट्रीगार्डवर वर्गणीदाराच्या आईचं नाव छापण्यात आले आहे. या झाडांच्या माध्यमातून आईच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. सलग महिनाभर दररोज गावातील सर्व गावकऱ्यांनी यासाठी श्रमदान केले. गावामध्ये युवकांच्या वतीने बनाचे संगोपण केले जाणार आहे. देलवडी येथे आईचा बनचे लोकार्पण झाले. यावेळी प्रकाश शेलार, महादेव शेलार, सुभाष फासगे, डॉक्टर श्रीवल्लभ अवचट, सोमनाथ बंड यांनी मनोगत व्यक्त केले. भीमा पाटसचे संचालक विकास शेलार, बाजार समिती संचालक शिवाजी वाघोले, नरेंद्र काटे, उत्तम लवटे, बाळासाहेब वाघोले, राजाराम शेलार, अर्जुन वाघोले, दत्तात्रेय शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
देलवडी तालुका दौंड येथे साकारण्यात आलेले आईचं बनात श्रमदान करताना ग्रामस्थ.