"मी अधिकाऱ्यांना थेट फोनच लावतो पण कॅमेरा चालू करायला सांगत नाही", अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 05:59 PM2022-07-10T17:59:06+5:302022-07-10T18:04:34+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोनवरील संवादाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल
पुणे : राज्यात काही भागात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तर काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवली आहे. त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेली होती. यावेळी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांनी दिल्लीतून पूरपरिस्थितीचा आढावा घेत हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधला होता. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. याबाबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
पवार म्हणाले, तुम्हाला पुणेकरांना माझ्या कामाची पद्धती चांगलीच माहिती आहे. हे मी पण अधिकाऱ्यांना थेट फोनच लावतो. पण त्यावेळी कॅमेरा चालू करायला सांगत नाही असा टोला अजित पवार यांचा मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे एका पुरस्कार सोहळ्यासाठी अजित पवार आपले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शिवसेना ठाकरेंचीच आहे
उद्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय होणार आहे. उद्या होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. असं आम्हाला वाटतं. उद्या सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहुयात. मी काही वकिलांना विचारले, 16 लोकांचा निकाल वेगळा लागला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितली आहे.
"मी पण अधिकाऱ्यांना फोन लावायचो, पण कॅमेरा चालू करायला सांगत नाही" #Pune#AjitPawarpic.twitter.com/Rro2PPRs8p
— Lokmat (@lokmat) July 10, 2022
मुख्यमंत्री यांनी दिले होते निर्देश
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेली होती. नदीला पूर आल्यामुळे येथील कुरुंदा गाव संपूर्ण पाण्याखाली गेले होते. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब समजताच त्यांनी गाडीतूनच स्वतः दिल्लीवरून हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधला आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची राहाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याची सूचना केली होती. याशिवाय, काही कमी जास्त लागल्यास स्वतः कळवावे, असेही निर्देश त्यांना दिले.