...त्या रंग नसलेल्या भोंग्यातून मला राष्ट्रगीत ऐकू येईल; अमोल कोल्हेनी सांगितला एक किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 02:59 PM2022-05-13T14:59:41+5:302022-05-13T15:15:58+5:30
पुण्यात शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ईदमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
पुणे : पुण्यात शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ईदमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळे बंद असणारा हा कार्यक्रम यावर्षी राज्य कोविड निर्बंधमुक्त झाल्याने मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमादरम्यान सर्व नागरिकांसाठी शिरखूर्मा व स्नेहभोजन व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि पदाधिकारी उपस्थित होते. खासदार अमोल कोल्हे यांनी सध्या सुरु असलेल्या भोंग्यांच्या वादावरून एक किस्सा सांगितला आहे.
कोल्हे म्हणाले, एका दुकानात ३ भोंगे लावले होते, एक हिरवा, एक भगवा आणि एक बिनरंगाचा होता. तिघांपैकी रंग नसलेल्या भोंग्याला हिरव्या आणि भगव्याने विचारलं, कि आता तुझं इथं काही काम नाही. आता सध्या आमचं मार्केट चालू आहे. त्यावेळी रंग नसलेल्या भोंगाने उत्तर दिले कि, मागील दोन वर्षात रुग्णवाहिकेसाठी माझाच वापर झाला आहे. त्यामधून अनेकांचे प्राण वाचले. पण दंगली घडल्या नाहीत. त्यानंतर एक विद्यार्थी भोंगा घेण्यासाठी दुकानात आला. दुकानदाराने त्याला कुठला भोंगा पाहिजे असं विचारले. विद्यार्थ्याने थेट रंग नसलेल्या भोंग्यांकडे बोट दाखवले. तेव्हा दुकानदराने 'तुला हा भोंगा का पाहिजे' असा प्रश्न विचारला. विद्यार्थ्याने अगदी सोप्या भाषेत उत्तर दिले कि, मला माझ्या वाढदिवसानिमित्त शाळेला हा रंग नसलेला भोंगा गिफ्ट द्यायचा आहे. या रंगाच्या भोंग्यातून हे ऐकू येणार असेल. त्या रंगाच्या भोंग्यातून ते ऐकू येणार असेल. तर मला रंग नसलेला भोंगा हवा ज्यातून आम्हा सर्व मुलांना राष्ट्रगीत ऐकू येईल असे त्याने सांगितले. कारण इतर दोन रंगांच्या भोंग्यांमधून येणारे आवाज शाळेसाठी महत्वाचे नाहीत. परंतु या रंग नसलेल्या भोंग्यांमधून वाजणारे राष्ट्रगीत मुलांना ऐकण्यास योग्य राहील असे मला वाटते. असा किस्सा त्यांनी कार्यक्रमात कोल्हे यांनी सांगितला आहे.