किरण शिंदे
पुणे : मला कधी कधी वाटतं.. पक्ष फुटला ते बर झालं.. कारण पक्षात एक तर ती राहिली असते किंवा मी राहिले असते.. ते पक्षात असतानाही माझी त्यांच्याशी लढाई सुरूच होती.. जो माणूस स्वतःच्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा व्यक्तीसोबत मी काम करूच शकत नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. पुण्यात रविवारी पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. याच बैठकीतील ऑफ द रेकॉर्ड भाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते. यात सुप्रिया सुळेंनी अनेक धक्कादायक वक्तव्य केले. त्यातील ही एक ऑडिओ क्लिप च्यात सुप्रिया सुळेंनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केलाय.
एकदा बीडला जा.. संतोष भाऊच्या आईला भेटा, बायकोला भेटा.. महादेव मुंडेंच्या बायकोला भेटा त्यांच्या मुलाच्या डोळ्यातील अश्रू बघा..काय चूक त्या लेकरांची..महादेव मुंडेंची बायको मला विचारत होती माझ्या लेकरांची चूक काय. काय उत्तर देणार मी त्यांना.. संतोष भाऊंच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या आईने हात धरला आणि मला न्याय देणार का असा प्रश्न विचारला. शब्द दे मला सुप्रिया की तू मला न्याय देशील. मला कधी कधी वाटतं बरं झालं पक्ष फुटला. कारण ते जर या पक्षात राहिले असते तर ते तरी राहिले असते नाहीतर मी तरी राहिले असते. मी त्या पक्षात काम करूच शकत नाही जिथे असा माणूस असेल. संपूर्ण जगाला माहित आहे की माझी लढाई त्यांच्याशी पक्षात असतानाही होती. मी हे कधी बाहेर बोलले नाही पण आज संघटनेत बोलतेय. जो पुरुष स्वतःची जी बायको असेल, ती आपल्या मुलांची आई आहे, तिच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो. एक तर तो पुरुष नाहीच. अशा व्यक्तीसोबत मी काम करणार नाही. आणि तेव्हापासून लढाई सुरू झाली. आज पहिल्यांदा मी हे बोलतेय. मी आज हे माईकवर बोलते. मी नाही कुणाला घाबरत. फालतू लढाई मी लढत नाही. विरोधी पक्षात आयुष्य घालवेल पण नैतिकता सोडणार नाही. मला कॉन्ट्रॅक्टरचे पैसे नकोय. माझं घर त्या पैशावर चालत नाही.
खरंतर कधीकाळी भारतीय जनता पक्षात असलेले धनंजय मुंडे अजित पवारांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले होते. त्यानंतर वेळोवेळी अजित पवार धनंजय मुंडे याच्या पाठीशी उभे राहिले. इतकच नाही तर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा देखील धनंजय मुंडे यांची भूमिका महत्त्वाची होती. आणि आता सुप्रिया सुळेंची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस कडून काय प्रत्युत्तर येतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.