इंदापूर: इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी काही शो बाजी करायला मुंबईला गेलेलो नाही. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना, बावीस गावांना हक्काचे पाणी कशा पद्धतीने मिळेल यासाठी प्रयत्न करत आहे. येत्या सव्वातीन वर्षात पुढच्या शंभर वर्षांचा विचार करून इंदापूर तालुक्यामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे असे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परिसरात शानिवारी (दि. ४) इंदापूर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री भरणे बोलत होते. ते पुढे म्हणाले, आगामी निवडणुकांमध्ये गट-तट विसरून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा कसा गाजेल, याकडे लक्ष द्या. तसेच काही ढोंगी लोक येथील जाती-पातीचे राजकारण करतील, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. या लोकांचे पाठीमागील वीस वर्षांचे रिपोर्ट पाहिले पाहिजेत. मागच्या वीस वर्षात कुठे विकास होता. एखादा काम करणारा असेल तर भले त्याला उचलून घेऊ नका, मात्र उगीच काम करणाऱ्याच्या मार्गात काटे पेरायचे काम कुणीही करू नये. त्यामुळे काम करणाऱ्याला काय वेदना होतात ते तुम्हाला समजणार नाही. एखादी खोटी बातमी कुठे आली तर त्याच्या काय वेदना होतात ते तुम्हाला कळणार नाही. त्या वेदना समजुन घ्यायच्या असतील माझ्या बायकोला विचारा असेही राज्यमंत्री भरणे यावेळी म्हणाले.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप गारटकर, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, हनुमंत कोकाटे, सचिन घोटकुल, स्वप्निल कोंडे-देशमुख, अॅड. शुभम निंबाळकर, बाळासाहेब ढवळे, सचिन खामगळ यांच्यासह राष्ट्रवादीचे इंदापूर पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. --------------------------भावकी-भावकी न करता गोरगरिब समाजाकडे लक्ष द्या... गाव भावकी विसरून गोरगरिब भटक्या समाजाकडे सुद्धा लक्ष द्या. त्यांच्या जास्त अपेक्षा नसतात. त्यांची नुसती विचारपुस केली एखादे काम केले तर विरोधकांनी लाख रूपये जरी समोर टाकले तरी तो आपल्याला विसरणार नाही. तुमच्या गावकी आणि भावकीची कामे खुप मोठी असतात. मात्र त्यांची कामे खुप छोटी आहेत. फक्त भावकी-भावकी न करता या गोरगरिब समाजाकडे देखील लक्ष द्या, अशा शब्दात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. .