पुणे : सध्या मॉन्सून देशात दाखल झाला असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. परंतु, आज पुणेकरांना दुपारी उन्हामुळे प्रचंड उकाडा सहन करावा लागला. परंतु, या उकाड्यानंतर सायंकाळी हलक्या सरींचा आनंद पुणेकरांना मिळण्याची शक्यता आहे. मात्र सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामानशस्त्र विभागाने दिला आहे.
सध्या राज्यभरातील आणि पुणे शहरात दुपारी निरभ्र आकाश असून, प्रचंड उकाडा जाणवत आहे. शहरातील कमाल तापमान ३६ अंशावर आहे. तापमान चाळीशीच्या आत असले तरी उष्णता अधिक जाणवत आहे. पुणेकरांना घामाच्या धारा येत आहेत. सायंकाळी मात्र विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज देण्यात आला आहे.
दरम्यान, विदर्भात उन्हाच्या झळा वाढल्याने पारा ४३ अंशांच्या पार गेला आहे. उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने आज (दि. ८) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा मेघगर्जनेसह, पावसाची शक्यता आहे. यातच उष्ण व दमट हवामान असह्य ठरण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बरसणार !
पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात म्यानमार किनाऱ्याजवळ समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तमिळनाडू आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तर छत्तीसगडपासून तेलंगणा ते उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे येत्या आज गुरूवारी राज्यात उष्ण व दमट हवामान आहे. परिणामी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.