पुणे : मी कधीच वारीला जात नाही, मात्र वारीचा अनादरही करत नाही. काही कामानिमित्त सोलापूर भागात गेलो तर मोजक्या लोकांसह पंढरपूरला जाऊन विठोबाचे दर्शन घेतो. दुस-या दिवशी वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रांमध्ये फोटो यावा, अशी कधीच अपेक्षा नसते. प्रसिध्दीसाठी मी देवदर्शनाला जात नाही. मला कोणत्याही गोष्टीचे अवडंबर करायला आवडत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अमित शाहंचा नामोल्लेख टाळत अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
राष्ट्र सेवा दलातर्फे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते शामसुंदर महाराज सोन्नर लिखित 'उजळावया आलो वाटा' या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी एस.एम.जोशी सभागृहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. याप्रसंगी तुकाराम महाराजांचे वंशज बापूसाहेब महाराज देहूकर, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाचे मुख्य चोपदार राजाभाऊ चोपदार, सुभाष वारे, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त प्रकाश परांजपे, महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘सध्या टीव्ही, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी समोर येतात. हा विज्ञानाचा चमत्कार असला तरी पुढील पिढी तंत्रज्ञानाचा वापर योग्य पध्दतीने कसा करेल, ही बाब चिंताजनक बनली आहे. देशाच्या, समाजाच्या हिताच्या गोष्टी, विचार यातून पुढे यायल्या हव्यात. पूर्वीच्या काळी अशी कोणतीही माध्यमे उपलब्ध नसताना किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन झाले. विठोबाच्या दर्शनाने सामान्य माणूस, शेतक-यांना मानसिक, वैचारिक, बौध्दिक आधार आणि आत्मविश्वास मिळतो. नामदेवांनी संतपरंपरेचा विचार देशात सर्वदूर पोहोचवला. शेतक-यांमध्ये किर्तनातून आत्मविश्वास जागवण्याची, धर्मकांड करणा-या प्रवृत्तीच्या आहारी न जाता संतविचार मनावर ठसवण्याची नितांत गरज आहे.’ आजही स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदललेला नाही. कर्तृत्व ही केवळ पुरुषांची मक्तेदारी नाही. स्त्रीसुध्दा तितकीच कर्तृत्ववान आहे. स्त्रीची महती संतांनी किर्तनातून अनेक वर्षांपूर्वी अधोरेखित केली.
देहूकर म्हणाले, ‘संतांनी देव जगवला आणि समाज जागवला. आम्ही मनूस्मृतीला नावे ठेवत नाही; मात्र आद्यक्रांतीचे जनक संतच आहेत, यात शंका नाही. तुकाराम महाराजांना त्या काळातही लोकशाही अभिप्रेत होती. ज्यांनी गाथा वाचली, तो माणूस कधीच आत्महत्या करणार नाही. संताकडे दूरदृष्टी, सुधारणेची दृष्टी होती. समग्रतेचा विचार सांगितला. चांगल्या संस्कारांचा दुष्काळ पडला तर मानवता मरेल. तेच संस्कार, विचार जिवंत ठेवले तर मानवता जिवंत राहील.
दरम्यान 'नवसाकारणे होती पुत्र तर का करणे लगे पती' असं सांगत संत तुकाराम महाराजांनी 400 वर्षांपूर्वी अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम केले, याचे उदाहरण तुकाराम महाराजांचे वंशज पुण्यातील कार्यक्रमात व्यासपीठावरून देत होते. त्यावेळी 'आंबे खाऊन मुले होतात', असा टोमणा शरद पवारांनी संभाजी भिडेंचे नाव न घेता लगावला.