पुणेः भर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारून 'प्रेमाचा संदेश' देण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा 'प्यार की बात' केली आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर माझं प्रेम आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल राग नाही. पण ते माझा तिरस्कार करतात. अर्थात, त्यालाही माझी हरकत नाही, असं टिप्पणी राहुल यांनी केली. मोदी हे द्वेषाचं राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस सातत्याने करत आहे. त्यावरच राहुल गांधींनी पुन्हा निशाणा साधला.
राहुल यांनी आज पुण्यातील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. शिक्षण, बेरोजगारी, ७२ हजाराचा 'न्याय', याबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली आणि मोदी सरकारच्या अपयशावरही बोट ठेवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुक्त कार्यक्रमांमध्ये सहभागी का होत नाहीत? प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि त्यांना त्याची उत्तरं द्यावीच लागतील. पण आपल्यालाच सगळं माहीत आहे आणि इतरांना काहीच कळत नाही, हा मोदींचा अॅटिट्यूड आहे, असा टोला त्यांनी लगावला. तोच धागा पकडत, मोदींबद्दल आपल्या मनात अजिबात राग नाही, पण त्यांच्या मनात माझ्याबद्दल तिरस्काराची भावना आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
याआधी संसदेत राहुल गांधी यांनी मोदींची गळाभेट घेऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. प्रेमाने मनं जिंकण्याची काँग्रेसची संस्कृती दाखवण्याचा तो प्रयत्न होता. परंतु, या गळाभेटीनंतर डोळा मारल्यानं त्यांचीच खिल्ली उडवली गेली होती. आता निवडणुकीच्या तोंडावर, पुन्हा एकदा प्रेम राग आळवून राहुल यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे.
एअर स्ट्राईकचं समर्थन
पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकबद्दल विचारलं असता, आपण या स्ट्राईकच्या बाजूनेच असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. एअर स्ट्राईकचं श्रेय हे हवाई दलाचं, वैमानिकांचं आहे. पंतप्रधानांनी त्याचं राजकारण करणं दुर्दैवी असल्याची चपराकही त्यांनी लगावली.
प्रियंका माझी बेस्ट फ्रेंड
लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून प्रियंका गांधीही प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. आपल्या बहिणीसोबतच्या नात्याबद्दल राहुल दिलखुलास बोलले.
प्रियंका यांच्यासोबत माझं नातं खूप खास आहे. आजी आणि वडिलांच्या हत्येनंतर ती माझ्यासोबत होती. आम्ही एकत्र वाढलो. काही वेळा एकमेकांसाठी माघारही घेतली. तिने बांधलेली राखी मी तुटल्याशिवाय काढत नाही. लहानपणी आम्ही भांडायचो, पण आता नाही. ती मला गोडधोड खाऊ घालून जाड करण्याचा प्रयत्न करते. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, अशा हळव्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.