पुणे : एकवेळ आमदार-खासदारकी, अगदी मुख्यमंत्रिपदासाठी केल्या जाणाऱ्या सर्व पातळ्यावरील राजकारणावर नियंत्रण ठेवता येईल; मात्र पालिकांच्या आणि त्यात पुणे महानगरपालिकेच्या राजकारणाचा अंदाज लावणे महाकठीण आहे. राजकीय जीवनात अनेक महापालिकांचे राजकारण जवळून अनुभवलेले असतानाही, अद्याप महानगरपालिकेचे राजकारण आपल्याला उमगले नसल्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार म्हणाले. तुमच्यासोबत तुमची म्हणून वावरणारी माणसे पुणे मनपाच्या निवडणुका जाहीर होताच रंग बदलतात आणि कोण कुठे जाऊन बसेल, याचा नेम नसल्याचेही ते म्हणाले.माजी महापौर उल्हासराव ढोले-पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्त पवार यांच्या हस्ते सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. या वेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, हैदराबादचे नवाब अहमद अलम खाँ, कमल ढोले पाटील, खासदार वंदना चव्हाण, आमदार विजय काळे, शंकर निम्हण, शंकर तोडकर, तसेच सत्कार समितीचे अध्यक्ष शशिकांत सुतार, रामभाऊ मोझे उपस्थित होते.पवार म्हणाले की, उल्हास ढोले-े पाटील यांनी व्यावसायिक पार्श्वभूमी नसतानादेखील गाई-म्हशींचा अभ्यास करून दुधाचा व्यवसाय वाढविला. व्यवसाय, शेती, शिक्षण आणि सर्वसामान्यांशी असलेले स्नेहाचे संबंध या जोरावर त्यांनी ३८ वर्षे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा विक्रम घडवला. त्यांनी अनेक राजकीय पक्ष बदलले असतील, परंतु त्यांनी स्नेहाचा पक्ष कधी सोडला नाही.ढोले पाटील म्हणाले की, आई वारली तेव्हा अगदी लहान होतो. दोन वेळच्या खाण्याची भ्रांत होती. त्या वेळी वहिनीने पुढाकार घेऊन आम्हाला वाढवले मी नक्की कोणत्या पक्षाचा याबाबतीत अनेकदा चेष्टा केली जाते; परंतु माझा शरद पवार हाच एकमेव पक्ष आहे. पवारांनी सोबत आणि साथ दिली म्हणून तरुन गेलो़ सर्व पक्षात माझे मित्र असल्याने महापौरपदाचा कार्यकाळ देखील सुखाने व्यथित झाला. सत्कार समितीचे अध्यक्ष शशिकांत सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्याध्यक्ष रामभाऊ मोझे यांनी प्रास्ताविक केले, तर समितीचे उपाध्यक्ष अरुण कुदळे यांनी आभार मानले.राजकीय आणि व्यावसायिक आदर्शच प्रस्थापित केलाभुजबळ म्हणाले की, दुधाचा रतीब घालून कार्यालयीन वेळेत मनपात येऊन महापौरांच्या खुर्चीची शोभा वाढवत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास उल्हास ढोले-पाटील यांनी प्राधान्य दिले. त्यांनी राजकीय आणि व्यावसायिक बांधिलकीची चुणूक दाखवत त्यांच्या वर्तनातून राजकीय आणि व्यावसायिक आदर्शच प्रस्थापित केला.पालकमंत्री बापट म्हणाले की, महापौराची निवडणूक आली की मनपात त्याकाळी गोल्डन गॅँग म्हणून परिचित असलेली मंडळी काय उद्योग करतील याचा भरवसा नसायचा आणि या गॅँगचे नेतृत्व ढोले-पाटील यांनी केले होते. शनिवारवाड्याच्या कट्ट्यावर बसून भेळ खात़ त्यांना महापौरपद, तर मला स्टॅँडिंग कमिटीचे अध्यक्षपद असा तह पाटील आणि माझ्यात ठरला होता. याप्रसंगी उल्हास ढोले-पाटील यांच्या महापौरपदाच्या कार्यकाळातील अनेक किस्से आणि आठवणींना उजाळा देण्यात आला. या वेळी महापौर मुक्ता टिळक यांनी मनोगत व्यक्त केले.
पालिकेचे राजकारण मला उमगले नाही- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 3:20 AM