VIDEO: "मी नौटंकी करत नाही, सामान्यांच्या प्रश्नांसाठी..." शिवनेरीवरून आढळरावांच्या प्रचारास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:27 AM2024-03-28T11:27:56+5:302024-03-28T11:33:59+5:30
शिवनेरीच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन मी माझ्या प्रचाराची सुरुवात केली आहे....
पुणे : अनेक वर्षांपासून मी तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे दोन्ही प्रकारे शिवजयंती करतो. शिवरायांच्या शिवनेरीच्या पायथ्याशी माथा टेकून मी आज माझ्या प्रचाराची सुरुवात केली आहे. यापुढे प्रचारादरम्यान आणि निवडून आल्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न आणि दुधाच्या भावाचे प्रश्न सोडविण्यावर माझा भर असणार आहे. मी नौटंकी करत नाही. मी शेतकरी आहे, शेतीतील माणूस असल्यामुळे मला त्यांच्या प्रश्नांची आणि अडचणींची जाणिव आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. ते शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पाटील यांनी शिवनेरीवरून त्यांच्या प्रचाराची सुरुवात केली.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, शिवनेरीच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन मी माझ्या प्रचाराची सुरुवात केली आहे. दीड वर्ष मी जनतेच्या सहवासात राहून त्यांचे प्रश्न जाणून घेतले आहेत. काही प्रश्न मी सोडवले आहेत. मी विनाकारण नौटंकी करत नाही. पुढील काळात जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल.
शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हेंनी शिवनेरीवर हजेरी लावली होती. यावर विचारले असता पाटील म्हणाले, सगळेजण शिवप्रेमी आहेत. ज्यांना-ज्यांना महाराजांबद्दल आस्था आहे त्यांनी गडावर यावे.
"मी नौटंकी करत नाही, सामान्यांच्या प्रश्नांसाठी..." शिवनेरीवरून आढळरावांच्या प्रचारास सुरुवात#shirur#LokSabhaElection2024pic.twitter.com/rpwOSanx1O
— Lokmat (@lokmat) March 28, 2024