"मला मीडियासमोर यायला आवडत नाही..." अखेर अजित पवार पुणे अपघातावर बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 12:51 PM2024-05-25T12:51:14+5:302024-05-25T12:51:55+5:30
पवार यांच्या गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी या प्रकरणात मध्यरात्री ३:०० वाजता पोलिस ठाण्यात जाऊन राजकीय दबाव टाकत पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला, असा आरोप होत आहे...
पुणे : बड्या बापाच्या बिघडलेल्या पोराने आलिशान पोर्शे गाडी मद्यप्राशन करून विनापरवाना चालवत दोन तरूण अभियंत्यांचा बळी घेतला, त्या भीषण अपघातावर बाळगलेले मौन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर आज सोडले. मी सगळी माहिती घेत होतो, तरीही माझे लक्ष नाही, असे पसरवले जात आहे, दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई होईल, असे पवार यांनी धायरीतील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांबरोबर बोलताना शुक्रवारी सायंकाळी सांगितले.
पवार यांच्या गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी या प्रकरणात मध्यरात्री ३:०० वाजता पोलिस ठाण्यात जाऊन राजकीय दबाव टाकत पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला, असा आरोप होत आहे. माझा त्याच्याशी काहीच संबंध नाही, असे काही दिवसांपूर्वी पवार यांनी सांगितले होते, तसेच आजही त्यांनी आमदार टिंगरे यांनी यावर खुलासा केला आहे, असे स्पष्ट करत जास्त बोलण्याचे टाळले. यात कोणाचाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही, प्रकरण गंभीर आहे, असे ते म्हणाले.
पोलिस आयुक्तांकडून आपल्याला वेळोवेळी या घटनेची माहिती सविस्तर दिली जात होती, असा दावा करून पवार म्हणाले, मला मीडियासमोर यायला आवडत नाही. मी मंत्रालयात माझे काम करत असतो. हवे तर माझ्या तिथे येण्याचे टाईमिंग चेक करा. देवेंद्र फडणवीस मला म्हणाले, मी पुण्याला निघालो आहे. प्रकरण गंभीर आहे, त्याकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे, असे मी त्यांना सांगितले. त्यांनी इथे येऊन सगळी माहिती घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदही घेतली. न्यायालयाने जामीन दिला तर तो त्यांचा प्रश्न आहे. या संपूर्ण प्रकरणात पारदर्शीपणे काम झाले आहे, कसलाही राजकीय हस्तक्षेप झालेला नाही, असा दावाही पवार यांनी केला.
इंदापूर तसेच अहमदनगरमधील अकोला तालुक्यातील बोट दुर्घटना अपघातांचीही सगळी माहिती घेतली. अशा घटनांचे राजकारण करू नये. दुष्काळी स्थिती आहे. मात्र, बैठका घेतल्या तर मतदारांना प्रलोभन दाखवले वगैरे टीका होऊ शकते. त्यामुळे आयोगाकडे परवानगी मागितली आहे, असे पवार यांनी सांगितले. अपघातप्रकरणात पोलिस आयुक्तांवर आरोप केले जात आहेत, तर आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत. कोणी फोन केला, कोणी पैसे घेतले, याबाबत पबचालक, बारचालक यांनी सांगावे. कितीही श्रीमंत बापाचा पोरगा असला तरी त्याला सोडले जाणार नाही, असे पवार म्हणाले.
मला मीडियासमोर यायला आवडत नाही
अपघात झाला तेव्हा व त्यानंतरचे दोन दिवस मी मंत्रालयातच होतो, काम करत होतो. पण सगळी माहिती घेत होतो. हवे तर मंत्रालयातील माझे टायमिंग चेक करा. देवेंद्र फडणवीस माझ्यासमोरच पुण्याला निघाले. मी त्यांना प्रकरण गंभीर आहे, यात बारकाईने लक्ष द्यायला हवे, असे सांगितले. ते इथे आले, त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तरीही माझ्याबाबत जाणीवपूर्वक गैरसमज पसरवला जात आहे, की मी लक्ष घातले नाही. मला माध्यमांसमोर यायला आवडत नाही. मी माझे काम करत असतो. न्यायालयाने जामीन दिला, तर तसे न्यायालयाला वाटले असेल. पब चालक किंवा अन्य कोणी पैसे दिले, असे असेल तर तसे पुरावे द्यावेत. आमदार सुनील टिंगरे यांनी खुलासा केला आहे. जे दोषी असतील, त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. ते पोलिसांचे काम आहे.