पुणे : सुप्रिया सुळे यांच्याबाबत अब्दुल सत्तार जे बोलेले त्याच्या शब्दाचा विपर्यास करण्यात आला. आम्ही महिलांसाठी उद्योग आणत आहोत. महिलांच्या उद्योगाला पुढे नेत आहोत. त्यामुळे अब्दुल सत्तारच्या प्रश्नावर मला काहीच बोलायचे नाही, असे वैतागून केंद्रीय सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांनी या विषयावर बोलणे टाळले.
फिक्की महिला आघाडीच्या वतीने आयोजित राष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, नवीन सरकार येऊन तीन महिनेच झाले आहेत. हे गेले ते गेले असे उद्योगाबाबत बोलू नका. महाराष्ट्रात उद्योग येण्यासाठी वेटिंगवर आहेत. उध्दव ठाकरेंच्या काळात उद्योगासाठी पोषक वातावरण नव्हते, आता आहे, त्यामुळे मोठे उद्योग येतील. तसेच नोटबंदीमुळे रोजगार यायला काही बंधने आलेली नाहीत.
राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी काही नियम असतात. ते पाहून जाहीर होईल. पण दुष्काळ जाहीर न करताही मदत दिली जात आहे. उध्दव ठाकरेंच्या काळात त्यांनी ओला दुष्काळ जाहीर केला का ? त्यांना शेतकऱ्यांना मदत देणार होते, दिली का ? असा सवाल राणे यांनी उपस्थित केले. मुख्यमंत्री असताना ठाकरे शेतकऱ्याच्या बांधावर गेले का ? केवळ २६ मिनिटे ते गेले. मातोश्रीमध्ये बसणाऱ्या ठाकरेंनी टीका करणे बंद करावे.
भारत जोडो ही घोषणा काँग्रेस करत आहे. पण ज्या ठिकाणी यात्रा चालली आहेे, तिथे लोकं दुसरीकडे जात आहेत. राहुल गांधीचा पायगुण चांगला नाही. ते जिथे जातात तिथे जाऊन काँग्रेस तोडो अशी यात्रा होत आहे.
एका दिवसात उद्योग येत नाही !
कोकणात किती उद्योग आले या प्रश्नावर राणे म्हणाले, एका दिवसात उद्योग उभे राहत नाहीत. त्याला जमीन घ्यावी लागते. जिल्हाधिकारी जमीन सुपूर्द करतो. त्यातले आरक्षण पहावे लागते. मग उद्योजकाला जागा देणे, प्लांट पाडून देणे हे सर्व चालले आहे.
त्याचे नाव नको घेऊ
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याविषयी एक प्रश्न पत्रकाराने विचारला. त्यावर नारायण राणे म्हणाले, त्याचे नाव नको घेऊ, जय हिंद, जय महाराष्ट्र.‘ असे बोलून ते तिथून निघून गेले.