माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 02:15 PM2024-05-21T14:15:13+5:302024-05-21T14:17:53+5:30
मतदानानंतर मावळचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
Maval Lok Sabha ( Marathi News ) : यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणे उदयास आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी महायुतीत सामील झाल्यानंतर कार्यकर्त्यांचं मनोमिलन होऊन मतं ट्रान्सफर होणार की नाही, याबाबतची चर्चा निवडणुकीदरम्यान चांगलीच रंगली. अशातच आता मतदानानंतर मावळचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. "राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी सर्व कार्यकर्त्यांना माझं काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेनंतर आमदारांनी, पदाधिकाऱ्यांनी माझं काम केलं. मात्र राष्ट्रवादीचा जो खालचा कार्यकर्ता आहे, त्याने महायुतीचा धर्म पाळला नाही आणि काही ठिकाणी माझं काम केलं नाही. या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली होती. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या १०० टक्के कार्यकर्त्यांनी माझं काम केलं असतं तर समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिटही वाचलं नसतं," असं बारणे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.
राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी मला मदत केली नसल्याचं सांगत असतानाच श्रीरंग बारणे यांनी आपल्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला आहे. "मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत. या सर्व आमदारांनी माझं चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. माझ्या मतदारसंघात पिंपरी-चिंचवड आणि पनवेल ही दोन मोठी महानगरे आहेत. या महानगरांमध्ये महायुतीला मानणारा एक मोठा वर्ग आहे. उबाठा गटाची या मतदारसंघात कुठेही मोठी ताकद नाही. चिंचवड विधानसभा मतदारसंघात पडलेल्या ३ लाख २२ हजार मतदानापैकी मला २ लाखांपेक्षा जास्त मतदान पडेल आणि तिथे मला १ लाखापेक्षा जास्त मताधिक्य राहील. त्यानंतर पनवेल विधानसभा मतदारसंघात जे मतदान झालंय तिथंही मला १ लाख ७० हजार मतदान पडेल आणि तेथील मताधिक्य ७० हजारांपेक्षा अधिक असेल. हे मताधिक्य समोरचा उमेदवार कुठेच कमी करू शकत नाही. त्यामुळे या निवडणुकीत अडीच लाखांच्या मताधिक्याने माझा विजय होईल," असा दावा श्रीरंग बारणेंनी केला आहे.
दरम्यान, पार्थ पवार यांनीही त्यांच्या सहकाऱ्यांना मला मदत करण्यास सांगितली होती आणि त्यांच्याकडून कोणतंही चुकीचं काम झालं नाही, असंही यावेळी बारणे यांनी म्हटलं.
मावळमध्ये कशी होती राजकीय स्थिती?
पुण्याजवळील सांगवी-दापोडीपासून मुंबईजवळच्या घारापुरी लेण्यांपर्यंतचे क्षेत्र मावळ मतदारसंघात आहे. या मतदारसंघाची निर्मिती २००९ मध्ये झाली, तेव्हा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राबल्य दिसत होते. मात्र, पक्षातील अंतर्गत कुरघोड्या आणि गावकी-भावकीच्या राजकारणामुळे तिन्ही वेळा राष्ट्रवादीला शिवसेनेकडून पराभव पत्करावा लागला. महायुतीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा रिंगणात होते. त्यांची हॅट्रिक चुकवण्यासाठी महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे-पाटील यांनी दंड थोपटले होते.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे कोणते ठरले?
- बारणेंना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बळ असले, तरी मागील वेळी त्यांनी अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा पराभव केल्याने राष्ट्रवादीचा तो गट आता मदत करणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात होता.
- काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद तोकडी असली तरी रायगड जिल्ह्यातील शेकापची ताकद आणि मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाला मिळणारी सहानुभूती वाघेरेंच्या पाठीशी असल्याचं बोललं गेलं.
- प्रस्थापितांविरोधात असलेल्या नैसर्गिक नाराजीचा सामना करण्याची बारणेंना चिंता, तर नवा चेहरा आणि नवे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे वाघेरेंपुढे आव्हान होते.