'मी देखील गोडसेचा रोल केला आहे, प्रत्येक गोष्टीचं भांडवल करू नये...'; नानांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 12:11 PM2022-01-22T12:11:27+5:302022-01-22T13:06:31+5:30
प्रत्येक गोष्टीचं भांडवल करण्याची काही गरज नाही...
पुणे: सध्या सोशल मीडियावर खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (amol kolhe) यांनी नथुराम गोडसेचा (naturam godase) रोल केल्याने मोठी चर्चा सुरू आहे. यावर मोठे वादविवाद होताना दिसत आहेत. काही नेटकऱ्यांनी याला विरोध दर्शविला आहे तर काहींनी पाठींबा दिला आहे. यावर नाना पाटेकरांनी (nana patekar on amol kolhe role as nathuram godase) पुण्यात भाष्य केले. नाना म्हणाले, अमोल कोल्हे अभिनेते आहेत, त्यांनी कुठली भूमिका करायची नाही करायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
पुढे बोलताना नाना म्हणाले, 30 वर्षापूर्वी मी देखील गोडसेचा रोल केला आहे. ती फिल्म इंग्लिश होती. मी गोडसे केला म्हणजे मी त्याचे समर्थन केलं असं होत नाही. त्यामुळे कलाकार म्हणून हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जेव्हा एखादी व्यक्ती समर्थन करते तेव्हा तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता. माझ्या उपजीविकेचं साधन तेच असल्यामुळे मला ती भूमिका करावीच लागली होती.
'प्रत्येक गोष्टीचं भांडवल करण्याची काही गरज नाही. त्यांनी जेव्हा शिवाजीची भूमिका केली तेव्हा ही भूमिका का केली असं का विचारलं नाही. त्यावेळी तुम्ही त्यांना कलाकार म्हणून मान्यता दिली. जनसामान्यात त्यांनी अतिशय योग्य प्रकारे महाराज पोहोचवले, असंही नाना म्हणाले.