लोणावळा : मावल तालुक्यातील पाटण गावाच्या माथ्यावर असलेल्या विसापूर किल्ल्यावर अर्जुन पाटील, शैलेश गायकवाड, विक्रम जाधव, उतारेश्वर सुरवस हे चार मित्र पुण्याहून (मुळचे सर्व मिरज सांगली ) रविवारी दुपारी एक वाजता फिरायला आले होते. सायंकाळी पाच वाजता यातील अर्जुन पाटील हा इतर मित्रांपासून बाजूला चालत गेला व वाट चुकला. मी खाली गावाकडे चाललो आहे असा पहिला फोन त्याने बरोबरच्या मित्रांना केला. थोड्या वेळाने मी पडलो आहे, माझ्या मदतीला या असा फोन त्याने केला. बरोबरचे मित्र त्याला शोधत खाली गावापर्यंत आले. गावातील लोकांना घडलेली घटना सांगितली व गावातील काही तरुण अर्जुनला शोधण्यासाठी निघाले. त्याच वेळी शिवदुर्ग रेस्कू टिमला सात वाजता मेसेज आला होता. पण स्थानिक लोक त्याला शोधून खाली गावात घेऊन येतील म्हणून टिम वेट अँन्ड वाॅच करत होती. रात्री 9.20 ला स्थानिक नागरिकांनी शिवदुर्गला फोन केला की, पर्यटक मुलगा सापडला आहे पण त्याचा एक हात फ्रॅक्चर झाला आहे. मुक्का मार लागला आहे. हनुवटीला मार लागला आहे, दात पडले आहेत, मदतीला या. त्यानंतर शिवदुर्ग टीम विसापूरच्या दिशेने निघाली. अर्जुन उभा राहत होता पण चालताना पाय नीट पडत नव्हते. वाट चिकट, शेवाळलेले दगड, चिखल, दाट झाडी झुडपे यामध्ये त्याला चालवणे योग्य वाटत नव्हते म्हणून स्पाइन बोर्ड लावून स्केडच्या स्ट्रेचर मधून रात्री बारा वाजता रेस्क्यू करत त्याला पाटण गावात आणण्यात आले. पाटण गावातील लोकांनी खुप सहकार्य केले. गावातील लोकांनी त्यांची चहा पाण्याची सोय केली. अर्जुनला बदलायला कपडे दिली. त्याचे मित्र तोपर्यंत पाटण पर्यंत पोहचले होते त्यांच्या गाडीत अर्जुनाला बसवून दिले.
या रेस्कू ऑपरेशन मध्ये योगेश उंबरे, प्रणय अंभूरे, कुणाल कडू, रतन सिंग, आदित्य पिलाने, सिध्देश निसाळ, अमोल सुतार, योगेश दळवी, मयुर दळवी, सागर कुंभार, अजय मयेकर, चंद्रकांत बोंबले, अनिल आंद्रे, सुनिल गायकवाड, संभाजी तिकोणे, रवींद्र तिकोणे, विनायक तिकोणे व पाटण ग्रामस्त सहभागी झाले होते. पाटण ग्रामस्थ व शिवदुर्ग रेस्क्यू पथकामुळे आज अर्जुन पाटील या युवकाला जीवदान मिळाले.