पुणे : अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात केली आणि अधिकाऱ्यांची एकच धावपळ झालेली बघायला मिळाली. मात्र त्यावर स्पष्टीकरण देताना 'मला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सकाळी लवकर उठून कामाला लागायची सवय आहे' अशा शब्दांत पवार यांनी आपली बाजू स्पष्ट केली.
पुण्यात शुक्रवारी पवार यांनी पोलीस वसाहतीला भेट दिली. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी मुलाखती घेतल्या. शिवाय पुणे शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या विविध अधिकाऱ्यांशीही विविध प्रश्नांवर चर्चा केली. मात्र पवार यांनी सकाळी लवकर कामाला सुरुवात केल्यामुळे अधिकाऱ्यांची मात्र धावपळ उडाली होती. काही अधिकारी अगदी पळत आणि धापा टाकत धावताना दिसले. भर थंडीत अधिकारी पवार यांना भेटायला येतानाचे दृश्य बघायला मिळत होते. याबाबत पवार यांना विचारले असता, ' मला आणि शरद पवार यांना सकाळी लवकर उठून कामाला लागायची सवय आहे. आता ती सवय आहे, त्याला कोणी नाही म्हणू शकत नाही. अजित पवार काही रोज सकाळी उठून इथे येणार नाही. मी आठ दिवसांनी येणार.मग आठ दिवसांतून अधिकाऱ्यांनी लवकर आलं तर काहीच बिघडत नाही'.