पुणे : पुण्यात सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाला नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील हायवेंबरोबरच, सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांबाबत महत्वाचे मुद्दे मांडले. या कार्यक्रमात नितीन गडकरींनी अनेक विषयांवर त्यांच्या मिश्किल स्टाईलमध्ये टोलेबाजी केली. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे च्या बांधकामासाठी निधी पुरवण्याचा मुद्दा येताच नितीन गडकरींनी “माझ्याकडे पैशांची कमी नाही आणि मी कोणत्या अर्थमंत्र्यांकडे पैसे मागायलाही जात नाही”, असा टोला लगावला आहे.
''माझं वरळी-वांद्र्याशी भावनात्मक नातं आहे. या कामासाठी ६०-७० हजार कोटी लागले, तरी मी एक असा मंत्री आहे की ज्याच्याकडे पैशांची काही कमी नाही. आणि मी कोणत्या अर्थमंत्र्यांकडे पैसे मागायलाही जात नाही. त्यामुळे पैसा कसा उभा करायचा ही समस्या नाही. हाही बांधायला मी तयार आहे. फक्त त्याबाबत तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून धोरणात्मक काही निर्णय झाला, तर दिल्लीला नरीमन पॉइंटशी थेट जोडून देण्याच काम मी करून देईन”, असं ते म्हणाले आहेत.''
''अजित दादा, मी आता दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे बांधतोय. परवा मी त्याचं काम पाहिलं. एका ठिकाणी तो १२ लेन आहे. त्यावर १७० किमी स्पीडच्या गाडीत बसलो होतो. पण पोटातलं पाणी हललं नाही. त्याचं ७० टक्के काम झालं आहे. फक्त महाराष्ट्रातलं काम राहिलंय. या हायवेला मी जेएनपीटीपर्यंत नेणार आहे. माझी इच्छा होती की वसई-विरारपासून वरळी बांद्र्यापर्यंत हा मार्ग जोडला तर नरीमन पॉइंटवरून थेट दिल्लीला १२ तासांत पोहोचता येईल”, असं ते म्हणाले.''
जिल्ह्यात २२१ किलोमीटर लांबीच्या २२ महामार्ग प्रकल्पांचा नारळ गडकरींच्या हस्ते पार पडला
भुसंपादन करून दिलं तर पुण्यात रिंग रोड बांधून देईन, ही मोठी घोषणाही याप्रसंगी गडकरींनी केली. पुणे-बंगळुरू ४० हजार कोटींचा नवा महामार्ग बांधण्याची योजना आहे. तसेच पुणे-बंगळुरू नव्या महामार्गाच्या शेजारी नवं शहर वसवायचं आणि मेट्रोने जोडता येईल अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. जिल्ह्यात २२१ किलोमीटर लांबीच्या २२ महामार्ग प्रकल्पांचा नारळ गडकरींच्या हस्ते आज शुक्रवारी फोडला गेला. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्यात तब्बल १३४ कोटीं रुपयांची रस्ते, पुलांची कामे करण्यात येणार आहेत.