पुणे: एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे गुरुवारी पुण्यासह राज्यभरात ठिकठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि तीव्र शब्दात निषेध नोंदवला होता. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवड्याभरातच ही परीक्षा घेतली जाईल अशी ग्वाही देत या आंदोलनावर पडदा टाकण्यात आला होता. याचवेळी पुण्यात अजित पवारांना 'एमपीएससी'च्या परीक्षांबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी पवार म्हणाले मी काही अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही, या त्यांच्या मिश्किल टिप्पणी केली.
अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात शुक्रवारी (दि.१२) कोरोना आढावा बैठक होत आहे.यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पवार नेमके कुठले पाऊल उचलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. या बैठकीला वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, महापौर हे उपस्थित आहे. या बैठकीत शहरातील सध्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेत निर्णय घेतल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पवार म्हणाले, माझ्या मते एमपीएससीचा विषय आता संपलेला आहे. काल जे काही घडले दिले ते दुर्दैवी होते. विद्यार्थ्यांच्या संताप आणि भावना योग्यच आहे. पण काहीजण त्यात राजकारण करू पाहत आहे.पण आम्ही विद्यार्थ्यांबरोबर आहोत. काल मुख्यमंत्र्यांनी देखील एमपीएससी बाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
विद्यार्थ्यांच्या वयाच्या अटीबाबत निर्णय घेणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांसाठी जे काही करायचे ते सरकार करणारच आहे. एमपीएससी ने आज जाहीर केलेल्या २१ तारखेला परीक्षा होणार आहे. त्यात कोणताही बदल केला जाणार नाही असेेेही पवार म्हणाले.
हजारो विद्यार्थी उतरले होते रस्त्यावर...
१४ मार्चला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. आणि या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले. यापूर्वीही एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे आधीच निराश झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकच संतापाची लाट उसळून आली. याच रोषातून 'एमपीएससी'च्या उमेदवारांनी पुण्यात रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा व 'एमपीएससी'चा तीव्र निषेध व्यक्त केला होता.