मी सत्तेसाठी हापापलेलो नाही; रोहित पवारांना दिलीप वळसे पाटलांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 03:40 PM2023-07-09T15:40:50+5:302023-07-09T15:41:44+5:30
माझे भांडण साहेब व त्यांच्या कुटुंबांशी नाही
मंचर (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक तसेच मर्जीतले समजले जाणारे दिलीप वळसे पाटील यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत घेतलेली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. शरद पवार यांचे कट्टर समर्थक तसेच मर्जीतले म्हणून वळसे पाटील ओळखले जातात. त्यानंतर रोहित पवारांनी दिलीप वळसे पाटलांचा लेखाजोखा ट्विटर वर मांडून त्यांना प्रश्न विचारला होता. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. साहेबानी तुम्हाला अजून काय द्यायला पाहिजे होत? असं रोहित पवार म्हणाले होते. त्यावर दिलीप वळसे पाटलांनी उत्तर दिले आहे. मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात आज वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल वळसे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील चालू घडामोडी बाबत भाष्य केले.
रोहित पवारांच्या पोस्टला उत्तर देत वळसे पाटील म्हणाले, रोहित पवार यांनी पोस्ट केली आहे. तुम्हाला साहेबांनी अजून काय द्यायला पाहिजे होते. साहेबांनी मला सर्व काही दिले आहे. जीवनभर मी त्यांचा कृतज्ञ राहील. रोहित यांची भेट झाली असता मतदारसंघाचा प्रश्न असेल तर मी आमदारकी सोडतो तुम्ही येथे उभे राहा. माझे भांडण साहेब व त्यांच्या कुटुंबांशी नाही. ते पुढे म्हणाले, मी सत्तेसाठी हापापलेलो नाही. तालुक्यातील जे प्रश्न शिल्लक राहिले आहेत ते सगळे सोडवायचे आहेत. आपली लढाई शरद पवार यांच्याबरोबर नाही. त्यांच्यावर रागही नाही. त्यांनी तालुक्याला भरभरून दिले आहे. कारखाना, बंधारे, बँका हे सर्व करताना ते पवार यांच्यामुळे झाले माझ्यामुळे नाही हे मी नेहमी सांगतो.
अनेक वेळा सांगूनही त्यांनी ऐकले नाही
पवार यांची सभा असेल तर सर्वांनी जावे असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. देवदत्त निकम याचे नाव न घेता निष्ठेचा प्रश्न काही लोकांनी तयार केला आहे. दहा वर्षे कारखान्याचा अध्यक्ष, सात वर्ष बाजार समितीचे सभापती, लोकसभेला तिकीट देऊनही आता वेगळी भूमिका घेतली. त्यांनी ती घेऊ नये हे माझे म्हणणे नाही. कोणाच्या डोक्यात असेल तर त्यांनी स्वतःचे नशीब आजमावे. पक्षाकडून सत्तेची पदे घेऊन प्रत्येक गावात जाऊन दुफळी गटतट करण्याचे काम त्यांनी केले आहे. अनेक वेळा सांगूनही त्यांनी ऐकले नाही असा टोला वळसे पाटील यांनी लगावला. परिसराच्या प्रगतीसाठी काम करत राहू असे ते म्हणाले.