लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. हे विसरून राज्य सरकारने रस्त्यावरची भांडणे असतात त्याप्रमाणे पोरखेळ चालविला आहे. राज्यपालांना विमानातून उतरविणे हे अत्यंत दुर्दैवी असून आपण कुठल्या पदाचा अपमान करत आहोत याचे भान या सरकारला राहिले नाही. राज्याच्या इतिहासात एवढा ‘इगो’ असलेले मुख्यमंत्री व सरकार पाहिलेले नाही,” अशा शब्दांत राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.
पुणे महापालिका आढावा बैठकीसाठी फडणवीस गुरुवारी (दि. ११) महापालिकेत आले होते. तत्पूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, राज्यपालांच्या बाबत झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख आहेत. ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची नेमणूक करतात. आपल्या पध्दतीनुसार राज्यपालांना कुठे जायचे असेल तर त्यांच्याकडून राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाला पत्र दिले जाते. त्यानुसार प्रशासन पुढील आदेश काढते. “आजच्या प्रकाराबाबत मी माहिती घेतली असता, सामान्य प्रशासन विभागास तसे पत्र कालच देण्यात आले होते,” असे फडणवीस म्हणाले.
त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने फाईल तयार करून मुख्यमंत्र्यांना सादरही केली होती. असे असताना राज्यपाल विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांना विमानातून उतरविणे हे योग्य नाही. हे अत्यंत चुकीचे असून कुठल्या पदाचा आपण अपमान करता आहोत याची जाणीव या सरकारला नाही. राज्यपाल ही व्यक्ती नाही. व्यक्ती येते व जाते. पण राज्य सरकारने या प्रकरणात पोरखेळ चाललेला आहे हे निषेधार्ह आहे, असे फडणवीस म्हणाले.
चौकट
सरकारची खासगी मालमत्ता?
“घडल्या प्रकारातून राज्यपालांचे काहीही वाईट होणार नाही. पण यातून राज्य सरकारची प्रतिमा मात्र मलिन झाली आहे. सरकारी विमान ही खासगी मालकीची मालमत्ता नसून ती जनतेची संपत्ती आहे. पण राज्य सरकार आज खासगी मालमत्ता असल्यासारखे वागत आहे. जनता हे सर्व पाहत असून हे सरकार किती अहंकारी आहे हे यातून दिसले.” -देवेंद्र फडणवीस
----------