मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज जळगावातील मुक्ताईनगरमध्ये आहेत. राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री व सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सोमवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि आज खडसेंच्या निवास्थानी फडणवीसांनी भेट दिल्यासंदर्भातील चर्चेवर चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत मांडलंय.
पवार-फडणवीस यांच्या भेटीची राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. या भेटीनंतर अनेकजण आपले मत मांडत आहे. मात्र, ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. तरीही, आज या भेटीसंदर्भात चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, तुम्हाला जो प्रश्न पडलाय तोच मलाही पडलाय. नेमकं चाललंय काय?, असे म्हणत सूचक प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.
आपण सगळेच एवढे पॉलिटीसाईज झालोय की, प्रत्येक गोष्टीचे राजकीय अर्थ काढतो. देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया ताईंना विनंती करुन शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या, ते आजारी असल्याने घरीच आराम करत आहेत. त्यामुळे, देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची भेट घेतली. सध्याची त्यांच्या आरोग्याची काळजी असल्याने या परिस्थितीत शरद पवार यांच्यासोबत राजकीय चर्चा करण्याचं धाडसच कोण करणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे, ही भेट केवळ सदिच्छा आणि प्रकृतीच्या विचारपूससंदर्भात होती, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
पवारांच्या भेटीनंतर आज जळगावात
देवेंद्र फडणवीस यांनी कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर फडणवीस आज थेट जळगावात रक्षा खडसेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर फडणवीस आज पहिल्यांदात जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आले आहेत. फडणवीसांनी यावेळी मुक्ताईनगरमधील ग्रामीण रुग्णलयाचीही पाहणी केली. याशिवाय वादळ आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही ते पाहणी करणार आहेत.
रक्षा खडसेंची भेट
जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या पक्ष बांधणी संदर्भात फडणवीस यांची रक्षा खडसे यांच्यासोबत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्याच आठवड्यात मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या आजी-माजी १० नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. या संदर्भात देखील फडणवीस रक्षा खडसे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं समजतं.