पुणे/किरण शिंदे : पहाटेच्या शपथविधी बाबत मी जे बोललो ते सर्व सत्य आहे. पण जे काही बोललो ते अर्धे बोललो आहे. योग्य वेळ आल्यानंतर उर्वरित अर्धे बोलणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी आज आजारी असलेले खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहाटेच्या शपथविधी बाबत मी जे काही बोललो ते सत्य बोललो. त्याचे वेगवेगळे अर्थ माध्यमांनी काढले. त्यामुळे मी काय बोललो ते शांतपणे बसून ऐका. त्याची एक एक कडी तुम्हाला जोडता येईल. त्यावेळेसच्या माझ्या पत्रकार परिषदा बघा, मी काय बोललो ते बघा, या सर्व गोष्टी तुम्ही पाहिल्या तर दुसऱ्या पुराव्याची तुम्हाला गरज भासणार नाही. पण मी अजून अर्धचं बोललो आहे. योग्य वेळ आली की उरलेलं अर्ध देखील मी बोलणार आहे.
ते पुढे म्हणाले, त्यावेळी मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न झाले. काही काळ ते यशस्वी झाले. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला असला तरी आज आधुनिक युग आहे. अभिमन्यू कडून आपण बऱ्याच गोष्टी शिकलो आहोत. आपल्या थोर पुरुषांकडून आपल्याला बरंच काही शिकता येतं. त्यामुळे चक्रव्यूह भेदून बाहेर कसे यायचे हे माहीत असल्यामुळे आम्ही तो चक्रव्यूह भेदला. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि आम्ही सरकार स्थापन केलं.