पुणे : नट म्हणून जी भूमिका मी साकारताे तिचा परिणाम खऱ्या आयुष्यावर हाेऊ देत नाही. नटाने कॅमेरासमाेर नट असावं, खऱ्या आयुष्यात ती भूमिका घेऊन वावरु नये असं मत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केले. नॅशनल असाेसिएशन ऑफ द वेलफेअर ऑफ फिजिकली चॅलेंज या संस्थेच्या पारिताेषिक वितरण कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी बीव्हीजी ग्रुपचे हनमंत गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष राहुल देशमुख, देविता देशमुख आदी उपस्थित हाेते.
या कार्यक्रमात राहुल देशमुख यांनी प्रभावळकर यांची मुलाखत घेतली. प्रभावळकर म्हणाले, नटाने अलिप्तपने भूमिका करायची असते. त्यासाठी तयारी महत्त्वाची असते. नट सिनेमात करत असलेली भूमिका त्याच्यावर माणूस म्हणून परिणाम करत असते. कुठली भूमिका आवडते या प्रश्नाचे उत्तर देताना प्रभावळकर म्हणाले, वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या भूमिका आवडतात. एखादी भूमिका करत असताना मी त्या भूमिकेच्या प्रेमात असताे. चिकाटी प्रत्येक क्षेत्रात आवश्यक असते. आपले ध्येय साध्य करण्यासाठी कुठलाही शाॅर्टकर्ट नसताे. मेहनत करायची तयारी नेहमी असावी.
त्यात्या विंचूची भूमिका मला जेव्हा आली तेव्हा मी व्हिलनचे काम करु शकेल का असा प्रश्न मला पडला हाेता. परंतु, महेश काेठारे यांना एक वेगळा प्रयाेग करुन पाहायचा हाेता. आयत्या वेळेला त्यात्या विंचूचा आवाज मला सुचला. त्या आवाजामुळे एक वेगळे बेअरिंग सुचण्यासाठी मदत झाली. भूमिकेचा प्रभाव मी कधीही वैयक्तिक आयुष्यावर हाेऊ देत नाही. नट हा कॅमेरासमाेर नट असावा. त्याने सिनेमातली भूमिका वैयक्तिक आयुष्यात आणू नये. राहुल देशमुख यांच्याबाबत बाेलताना ते म्हणाले, कलाकार म्हणून आम्ही दुसऱ्यांचे आयुष्य जगत असताे. परंतु देशमुखांसारखे लाेक दुसऱ्यांसाठी जगत असतात.
राहुल देशमुख म्हणाले, दिव्यांग मुलांना देखील प्रसिद्ध व्यक्तिंसारखं काहीतरी हाेता यावं यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आम्ही बाेलवत असताे. अंध विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले, स्फिफीन हाॅकिन्स यांच्यासारखं कर्तृत्व करण्याची ताकद तुमच्या प्रत्येकामध्ये आहे. कधीही खचून जाऊ नका. आपल्या वाट्याला आलेल्या गाेष्टींमधून काय शिकता येईल याचा विचार तुम्ही करायला हवा.