मी स्वत: व्यासपीठावर होतो, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं नेमकं काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 01:39 PM2022-06-16T13:39:47+5:302022-06-16T18:41:39+5:30
देहू संस्थान इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही प्रमुख उपस्थिती होती
मुंबई - संत तुकाराम महाराज पादुका चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टाळ, ढोलकी वाजवत भजन कार्यक्रम केला. रस्त्यावर बसून आणि कपाळाला काळं गंध लावून या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र भाजपचा निषेध नोंदवला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही अजित पवारांना बोलू न दिल्याने महाराष्ट्राचा अपमान झाल्याची टिका केली आहे. याबाबत, स्वत: त्या व्यासपीठावर असलेल्या चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, हा अतिशय साधा विषय आहे, यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला?, असा प्रतिप्रश्न पाटील यांनी केला.
देहू संस्थान इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मात्र पंतप्रधान यांच्या भाषणाआधी अजित पवार यांचं भाषण न घेता देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी आंमंत्रित करण्यात आलं. पवार यांना भाषणासाठी नाकारण्यात आलं. ज्यानंतर पवार काही न बोलताच बसून राहिलेत. पंतप्रधान यांनी पवार यांच्या भाषणाची आठवण मंचावर करून दिली. मात्र, स्वाभिमानाखातर पवार यांनी बोलण्यास नकार दिला. याच प्रकाराचा निषेध करत आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भजनाचा कार्यक्रम पुण्यात घेतला. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. तसेच, अजित पवारांनी स्वत:च बोलणार नसल्याचे म्हटले होते, असेही त्यांनी सांगितले.
''असं जर खरं असतं तर अजित पवार एकदा तरी बोलले असते. बसण्याची रचना अशी होती की, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अजित पवार आणि मी. संयोजकांनी नरेंद्र मोदींचं नाव घेतलं तेव्हा मोदी जागेवरुन उठलेच नाहीत. तेव्हा अजित पवारांना मोदींनी बोलण्याचा आग्रह केला होता. मात्र, अजित पवारांनी नकार दिला. तसेच, मी अगोदरच बोलणार नसल्याचं सांगितलं आहे, असे अजित पवारांनी म्हटले. विशेष म्हणजे हे आपण सर्वांनी टिव्हीवरही पाहिलं.
दरम्यान, प्रत्येक विषयाला राजकारणाची किनार जोडू नये, हा अतिशय साधा विषय आहे. अपमानाचा विषयच नाही, अजित पवारांना बोलायला नाही मिळालं, त्यात महाराष्ट्राचा अपमान कुठं आला. हा अनावश्यक वाद निर्माण केला आहे, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला.