मनसेचे नेते वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोअर कमिटीबाबत नाराजी बोलावून दाखवली होती. तसेच वसंत मोरे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत येण्याची देखील ऑफर दिली होती. त्यामुळे वसंत मोरे मनसेला रामराम करत राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आज मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी दोघांची भेट झाली.
अमित ठाकरेंची भेट घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अमित ठाकरेंना मी माझी अडचण सांगितली आहे. माझ्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. आता पुण्यातील कोअर कमिटीसोबत अमित ठाकरे बोलणार असून, माझी ते बाजू मांडणार असल्याची माहिती वसंत मोरे यांनी दिली. तसेच मला इतर पक्षाच्या ऑफर येताय, यात माझी काहीच चूक नसल्याचंही वसंत मोरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे आता अमित ठाकरेंनी कोअर कमिटीसोबत संवाद साधल्यानंतर वसंत मोरेंची नाराजी दूर होणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वसंत मोरेंनी माध्यमांशी बोलताना जाहीर नाराजी बोलावून दाखवली होती. पुणे शहरातील पक्षामधून मला डावलंल जातंय. मला लक्ष्य केलं जातंय. मला पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमाला बोलावलं जात नाही. तरीसुद्धा मी कार्यक्रमाला जातो. मला स्टेजवर बसवलं जातं, मात्र भाषणासाठी वेळ दिला जात नाही. या सगळ्या गोष्टी मी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना सांगितल्या आहेत, असं वसंत मोरेंनी सांगितलं होतं असं वसंत मोरेंनी स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, वसंत मोरेंनी जाहीर नाराजी बोलावून दाखवल्यानंतर मनसेचे पुण्यातील नेते बाबू वागस्कर यांनी सदर प्रकणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. वसंत मोरेंनी व्यक्त केलेल्या नाराजीवर पक्ष अधिकृतपणे दोन दिवसात भूमिका स्पष्ट करेल, अशी माहिती बाबू वागस्कर यांनी दिली. वसंत मोरे सातत्याने पक्षाची बदनामी होईल, अशी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतीत दोन दिवसांत विचार केला जाईल, असं मनसेनं ठरवल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दोन दिवस उलटूनही बाबू वागस्कर यांनी भूमिका स्पष्ट केली नाही.
मी मनसेतून गेल्यास पक्षाला फरक पडेल, पण...
काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधत, सध्या मी मनसे पक्षातच आहे. आगामी निवडणुकी जवळ येताय. त्यावेळी वसंत मोरे कुठे असतील, असा प्रश्न वसंत तात्यांना विचारला असता, मी सध्या कुठल्याही वाटेवर नाही. परंतु पक्षनेतृत्व आणि पक्ष याच्यावर मी नाराज नाही. मात्र पुण्यातील जी कार्यकारणी आहे, ती मला वारंवार डावलतेय. माझी कामे आणि सामान्या लोकांमधील असलेली प्रसिद्धी या लोकांना बघवत नाही, असं म्हणत वसंत मोरे यांनी पक्षाला घराचा आहेर दिला होता. तसेच राज ठाकरेंना वारंवार सांगूनही मला टाळण्यात येतंय. राज ठाकरे काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. त्यावेळी मला वाटलं राज ठाकरे पुण्यातील नेत्यांना काहीतरी बोलतील, मात्र असं काहीच झालं नाही, असं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मी मनसेतून गेल्यास पक्षाला फरक पडेल, परंतु इथल्या स्थानिक नेत्यांना आनंद होईल, असा दावा देखील वसंत मोरे यांनी केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"