पुणे : खरं सांगू मला खूप आनंद होतो आहे. माझ्या वाढदिवसाला इतके सगळे जण आले आहेत; त्यामुळे खूप भारी वाटत आहे. कुणी मला द्यायला गिफ्ट आणले आहे, तर कुणी खाऊ आणला आहे. या आनंदात मी सर्वांना ‘बदन पे सितारे लपटे हुए’ हे गाणे गाऊन दाखवले. तर, ‘अंबाबाई कृपा कर’ गाण्यावर डान्स करून दाखवला. सगळे माझे कौतुक करीत होते. मला शुभेच्छा देत माझे अभिनंदन केले. तो दिवस खूप मजेचा होता. वैशालीच्या चेहऱ्यावर वाढदिवसाचा आनंद ओसंडून वाहत होता.
वैशालीचा दहावा वाढदिवस नुकताच सोफोश येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी पुण्यातील हडपसर येथे राहणाºया वैशाली यादव हिच्या हृदयाला छिद्र असल्याचे कळताच यादव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आर्थिक संकट समोर उभे राहिले. पुरेशा मदतीअभावी तिच्या हृदयावरील शस्त्रक्रिया करता येणार नाही, हे तिचे काका प्रताप यादव यांना माहिती होते. काय करावे, कुणाकडे मदत मागावी, यावर बराच विचार झाला; मात्र काही प्रभावी उपाय सुचेना. यानंतर चिमुकल्या वैशालीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठविले. त्यात आपल्याला मदत करण्यात यावी, असे आवाहन केले होते. विशेष म्हणजे, पीएमपो कार्यालयाकडून तिच्या पत्राची दखल घेण्यात आली आणि रुबी हॉस्पिटलमध्ये तिच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्या शस्त्रक्रियेतून पूर्णपणे सावरून बºया झालेल्या वैशालीने बुधवारी आपला वाढदिवस सोफोश संस्थेत साजरा केला. संगीतकार व अभिनेते संदीप पाटील, सोफोशच्या प्रशासकीय अधिकारी शर्मिला सय्यद, वैशालीचे वडील, आजी, काका याबरोबरच सोफोशमधील कर्मचारीवृंद वाढदिवस साजरा करण्याकरिता उपस्थित होता. या प्रसंगी सभागृहाची आकर्षक सजावट करून, रंगीबेरंगी फुगे चिकटवून, लहान मुलांच्या विशेष उपस्थितीत वैशालीच्या जन्मदिवसाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.पंतप्रधानांचे वैशालीने मानले अभार१ पंतप्रधान कार्यालयातून अधिकारी श्रीकर परदेशी यांनी पंतप्रधानांच्या वतीने वैशालीला ‘तब्येतीची काळजी घे; भरपूर अभ्यास करून खूप मोठी हो,’ अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या. वैशालीनेदेखील पंतप्रधानांचे आभार मानले. सोफोशमधील वातावरण तिला मनापासून आवडते.२ वाढदिवशी तिने सादर केलेला डान्स पाहून पाटील यांनी येत्या२० जानेवारी रोजी होणाºया ‘सांगत्ये ऐका’ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याचे वैशालीचे काका प्रताप यादव यांनी सांगितले.३ दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानांना केलेल्या मदतीच्या अर्जामुळे त्यांनी वैशालीला मदत करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाला शस्त्रक्रिया करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तिच्यावर यशस्वीरीत्या उपचार करण्यात आले. या उपचारांनंतर वैशालीने तिचा दहावा वाढदिवस अनाथ मुलांच्या सोफोश संस्थेत साजरा केला.आता कुठेही दुखत नाही...तब्येतीत सुधारणा होत आहे. शाळा व्यवस्थित सुरू आहे. यापूर्वी छातीचे दुखणे चालू असायचे. आता मात्र शस्त्रक्रियेनंतर त्यात खूप फरक पडला आहे. पहिल्यासारखी चक्कर येत नाही. मी व्यवस्थित अभ्यास करू शकते, माझ्या आवडीची गाणी म्हणू शकते, डान्स करते. दुखण्याचा विसर पडला असून आता कुठेही दुखत नसल्याची भावना वैशाली आनंदाने व्यक्त करते.