पुणे : येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच रंग येत आहे. राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे गावागावांत जाऊन प्रचार करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवारही मैदानात शडडू ठोकून आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही मतदारसंघात सभा घेण्यास सुरूवात केली आहे. काल (गुरुवारी) एका सभेत बोलताना अजित पवारांनी मोक्का लागणाऱ्या कार्यकर्त्याला मी वाचवलं, असं वक्तव्य केलं होतं. उपमुख्यमंत्री पदावर असताना अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, आता बारामतीमध्ये दादागिरी करणाऱ्याचे नाव सांगा. त्याला बघतोच तो कशी दादागिरी करतो ते. सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. नानाच्या एका ओळखीच्या व्यक्तीला मोक्का लागत होता. सगळ्यांनी सांगितल्यानंतर त्याला वाचवलं. हे फक्त आतापुरतेच आहे. परत चुकला तर अजित पवाराकडे यायचे नाही. यापुढे कुणीच चुकीचं वागू नका, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
'सरकारने उत्तर द्यावे'-
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी कुणालाही मोक्का लागण्यापासून वाचवलं असेल तर हे धक्कादायक आहे. याबद्दल सरकारने उत्तर द्यायला हवं, असं सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवारांनी मोक्कापासून वाचवणं ही बाब धक्कादायक आहे. त्यांनी नेमकं कोणाला वाचवलं?, कोणत्या केसमधून वाचवलं?,आणि एवढ्या मोठ्या मोक्कामधून वाचवण्याची कारणं कोणती होती? याची माहिती द्यायला हवी आणि सोबतच सरकारनेदेखील याचं उत्तर द्यायला हवं.
हर्षवर्धन पाटील प्रकरणावरही सुळे आक्रमक-
हर्षवर्धन पाटील यांना कुणी शिव्या घातल्या तर मी ढाल बनून उभी राहीन. जर पुन्हा असं केले तर गाठ माझ्याशी आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला थेट इशारा दिला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर इथं सुप्रिया सुळेंनी सभा घेतली. त्या सभेतून त्यांनी अजित पवार गटावर जोरदार घणाघात केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कुणीही शिवीगाळ करायची नाही. सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे. जसा चढ असतो तसा उतारही असतो. माझ्या समोर बसलेली जनता उतरवेल, मला काहीही करायची गरज नाही. दमदाटी बंद करायची आहे. कुणीही आजनंतर बारामती लोकसभा मतदारसंघ किंवा महाराष्ट्रात कुणीही आमच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली तर त्यांना सांगायचं आधी सुप्रिया सुळेंना धमकी दे, मग माझ्याशी बोल असंही त्यांनी बजावलं.