नारायण बडगुजर- पिंपरी : ज्या रुग्णवाहिकेतून बेवारस मृतदेहांना घेऊन गेलो, त्याच रुग्णवाहिकेत कोरोनाग्रस्त रुग्ण म्हणून बसताना हातपाय थरथरत होते. दरदरून घाम फुटला होता. मात्र, रुग्णालयात झोपडपट्टीतील कमी वयाचे व तरुण रुग्ण दिसले. त्यांचा दिनक्रम पाहिला. त्यातून त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष दिसला. त्यामुळे कोरोनाशी दोन हात करण्याचे बळ मिळाले अन् जगण्याची उमेद आली. हे अनुभव आहेत कोरोनावर मात केलेल्या वाकड येथील एका पोलीस कर्मचाऱ्याचे.दत्तात्रय सजेर्राव येळे (वय ५०) असे कोरोनावर मात केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुणे शहरातील फरासखाना पोलीस ठाण्यांतर्गत कसबा पोलीस चौकीत अंमलदार म्हणून येळे नियुक्त आहेत. वाकड पोलीस वसाहतीत दोन मुले व पत्नीसह येळे वास्तव्यास आहेत. वाहन व जमावबंदीची अंमलबजावणी करताना येळे यांनी सहकाऱ्यांसह काही नागरिकांवर कारवाई केली. यात एका पोलिसाला कोरोनाची लागण झाली. त्यांच्या ''हाय कॉन्टॅक्ट रिस्क'' मधील २० पोलिसांना एका लॉजवर क्वारंटाइन करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यात येळे यांच्यासह अन्य एका पोलीस कर्मचाऱ्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.बेवारस मृतदेह घेऊन जाण्यासाठी एक पोलीस म्हणून खूप वेळा रुग्णवाहिकेत बसलो. आरोपी, गुन्हेगार तसेच मृतदेह घेऊन रुग्णालयात खूप वेळा गेलो. मात्र, त्याच रुग्णवाहिकेतून एक रुग्ण म्हणून जाण्याच्या विचाराने हातपाय थरथरत होते. दरदरून घाम फुटला होता. मनाने खचलो असतानाच रुग्णवाहिकेत बसलो. पुणे येथील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या जनरल वॉर्डमध्ये दाखल केले. तेथील वातावरण भयाण वाटले. अंगावर काटा आला, असे रेळे म्हणाले.रुग्णालयात पहिल्याच दिवशी सायंकाळी जेवण आले. मात्र, जेवण्याची इच्छा झाली नाही. माज्या वॉर्डात झोपडपट्टीतील काही तरुण रुग्ण होते. त्यांचा तेथील वावर सामान्य होता. त्यांनी आनंदाने जेवण केले. मी भुकेल्या पोटी रात्र जागून काढली. मनात विचारांचे काहूर माजले होते. पहाटेच्या सुमारास डोळा लागला. त्यानंतर मन खंबीर केले. तरुण रुग्णांची धडपड पाहिली. खूप शिकलेले नसताना किंवा खूप अनुभव गाठीशी नसतानाही त्यांच्यातील जगण्यासाठीची सकारात्मकता आणि संघर्ष मला दिसला. त्याच विचारांनी माझी सकाळ झाली. मन खंबीर केले आणि रुग्णालयातील पहिली सकाळ माज्यासाठी जगण्याची नवी उमेद घेऊन आली.
कोरोनाची लढाई जिंकायचीच आहे. त्यावर आपल्याला मात करायचीच आहे. या सकारात्मक विचाराने मी माझ्या दिवसाची सुरुवात केली. सकाळी नाश्त्यात पोहे आले. मन प्रसन्न करून ते खाल्ले. त्यानंतर जेवणात व नाश्त्याला कधी नकार दिला नाही. डॉक्टरांच्या सूचनांचे पालन केले. अखेरीस माझ्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या. त्यानंतर मला घरी सोडण्यात आले. घरी दोन मुले व पत्नीने साध्या पद्धतीने स्वागत केले. एका स्वतंत्र खोलीत आता क्वारंटाइन आहे.
कोरोनाची लागण झाल्यास घाबरून जाऊ नये. आत्मविश्वासाने सामोरे गेल्यास कोरोनावर मात करता येते. नकारात्मक बातम्या, माहिती यांपासून लांब राहिले पाहिजे. सकस आहार घेऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यावर भर द्यावा.- दत्तात्रय येळे, वाकड.