पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिनेश धाडवे यांच्यावर पक्षांतर्गत कायद्यानुसार कारवाई करण्याची पक्षाने तयारी सुरू करताच त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच असून, भाजपामध्ये प्रवेश केला नसल्याचे लेखी पत्र बुधवारी महापौर प्रशांत जगताप यांना दिले आहे. मनसेच्या राजेंद्र बराटे यांची भूमिका मात्र अद्याप अस्पष्ट आहे.महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर अनपेक्षितपणे पक्षप्रवेश, पडद्यामागच्या हालचाली, कुरघोडी, कारवाईचा बडगा आदी घडमोडींना वेग आला असून, राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश धाडवे, मनसेचे नगरसेवक राजेंद्र बराटे, माजी नगरसेवक राजेंद्र गोरडे यांनी भेट घेतली. या वेळी खासदार संजय काकडे, भाजपाचे गटनेते गणेश बिडकर उपस्थित होते. धाडवे, बराटे, गोरडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यांनी भाजपाचा शेला परिधान केल्याचे फोटो सोशल मीडियातून प्रसिद्ध झाले. मनसेचे नगरसेवक राजेंद्र बराटे यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, ‘‘पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना घडामोडींची माहिती दिली आहे. भाजपाचे गटनेते गणेश बिडकर यांनी सांगितले, धाडवे तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थांबले आहेत. निवडणूक येताच ते भाजपामध्ये प्रवेश करतील.राष्ट्रवादी आणि मनसेच्या प्रत्येकी एका नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसह मंगळवारी रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. खासदार संजय काकडे आणि भाजपाचे गटनेते गणेश बिडकर या वेळी उपस्थित होते. मात्र, राजकीय वातावरण तापल्यावर आपण केवळ सदिच्छा भेट घेण्यासाठी गेलो होतो, असे नगरसवेक दिनेश धाडवे (डावीकडून पहिले) यांनी सांगितले. मात्र, खांद्यावर घेतलेल्या कमळाच्या उपरण्याचे काय, याबाबत त्यांनी काही सांगितले नाही. खासदार संजय काकडे भाजपामध्ये सक्रियमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार संजय काकडे भाजपामध्ये सक्रिय झाले आहेत. काकडे यांच्या पुढाकारातूनच राष्ट्रवादी व मनसेमधील आजी माजी नगरसेवकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर नेण्यात आले. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये काकडे यांची भूमिका भाजपामध्ये महत्त्वाची राहणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.धाडवे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असल्यास पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांच्यावर निवडणूक लढविण्यास ६ वर्षे बंदी घालण्याची कारवाई करण्याचे पत्र विभागीय आयुक्तांना देण्याची तयारी सुरू केली. धाडवे यांनी बुधवारी सायंकाळी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी केवळ सदिच्छा भेट घेतली होती, असे पत्र महापौरांना दिले. मुख्यमंत्र्यांना केवळ भेटण्यासाठी धाडवे गेले असता फसवूण पक्षप्रवेशाचा घाट घातला, असे धाडवे यांनी स्पष्ट केल्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले.
धाडवे म्हणतात, मी राष्ट्रवादीतच...
By admin | Published: September 15, 2016 1:51 AM