Video: मी मोदींना सांगितलं अन् सुनीलला बोलावलं गेलं! अजितदादांनी सांगितला भेटीचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 12:43 PM2024-11-25T12:43:10+5:302024-11-25T12:43:49+5:30
सुनील आम्हाला म्हणायचा, ‘माझी ‘सीट’ गेली.’ पण मतदानाच्या दिवशी म्हणाला, ‘मी एक लाखाने निवडून येईन!
पिंपरी : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीचा प्रत्येक विजयी उमेदवार मुंबईत प्रत्येक पक्षकार्यालयात भेटीसाठी गेला आहे. त्या दरम्यान मावळचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके हेही पक्षकार्यालयात गेले. त्यावेळी अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या शेळके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा किस्सा उपस्थितांना सांगितला.
आमदार शेळके मुंबईत पक्षकार्यालयात गेल्यानंतर त्यांनी अजित पवार यांना वाकून नमस्कार केला. पवार यांनी जवळ घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभेसाठी पुण्यात आले असतानाचा किस्सा सांगितला. ‘मोदीसाहेब ज्यावेळी पुण्यातील सभेला आले होते, त्यावेळी सर्व उमेदवारांच्या भेटी घेत होते. मात्र सुनील बाहेरच होता. मी मोदीसाहेबांना सांगितले की, माझा एक आमदार बाहेर आहे. त्यावर मोदीसाहेबांनी सुरक्षारक्षकाला सांगितले की, अजितदादा म्हणतात त्यांना आत घ्या. त्यानंतर याला आत घेतले. मग आत घेऊन त्याची ओळख करून दिली. तोच फोटो त्याने सगळीकडे चालवला. सुनील आम्हाला म्हणायचा, ‘माझी ‘सीट’ गेली.’ पण मतदानाच्या दिवशी म्हणाला, ‘मी एक लाखाने निवडून येईन! अरे... म्हटले काय रे तू!’ हसत-हसत हा किस्सा सांगत असताना पवार यांनी कपाळावर हात मारून घेतला. या घटनेचा व्हिडीओ पवार यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
मी मोदींना सांगितलं अन् सुनीलला बोलावलं गेलं ! अजितदादांनी सांगितला भेटीचा किस्सा#pune#AjitPawar#sunilshelake#NCP#narendramodipic.twitter.com/aHofzicGeL
— Lokmat (@lokmat) November 25, 2024
मावळात एक लाखांच्या लीडने शेळके विजयी
मावळ विधानसभा मतदार संघात महायुतीतील नाराजांनी उदयास आणलेला मावळ 'पॅटर्न' फेल झाला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके विजयी झाले आहेत. त्यांना एक लाख ८ हजार ५६५ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पराभूत केले आहे. मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष आणि महायुतीतील नाराजांनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारात झालेल्या लढतीमुळे मावळकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. या मतदार संघात ३२,३५८ म्हणजेच १.४३ टक्के मतदान वाढले आहे. या वाढीव मतदानाने मावळ 'पॅटर्न'ला धक्का दिला आहे