लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पहाटेच्या शपथविधीबाबत अर्धेच सांगितले. वेळ आली की शिल्लक आहे तेही सांगेन, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जे सांगितले ते सत्यच आहे, असा दावाही त्यांनी केला. पहाटेचा तो शपथविधी शरद पवार यांची संमती घेऊन केला होता, या फडणवीस यांच्या दाव्यावर राज्यात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच फडणवीस यांनी बुधवारी पुण्यात त्याचा पुनरुच्चार तर केला.
फडणवीस यांनी भाजपचे खासदार गिरीश बापट यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ते म्हणाले, त्यावेळी मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न झाले. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला असला तरीही अभिमन्यूकडून आपण बरेच शिकलो आहोत. त्यातूनच आम्ही तो चक्रव्यूह भेदला आणि एकनाथ शिंदे आणि आम्ही सरकार स्थापन केले असे फडणवीस म्हणाले.
अमित शाह यांचा दिला दाखला.....अमित शाह यांनी सांगितले आहे की, विरोधकांनी कितीही खोटे नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला तरी लोकांचा मोदींवर विश्वास आहे. सन २००२ पासून मोदींना टार्गेट केले जात आहे. कधी नेत्यांच्या माध्यमातून तर कधी माध्यम समूहाचा वापर करून पण मोदी त्यातून सहीसलामत बाहेर पडले आहेत. अमित शाह त्यांच्या काही कार्यक्रमांसाठी म्हणून पुण्यात येत आहेत, निवडणूक प्रचारासाठी नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
फडणवीस खोटं बोलून राजकारण करत नाहीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटं बोलून राजकारण करत नाहीत. ते त्यांच्या रक्तात नाही. जे घडलं आहे तेच फडणवीस बोलत असतात, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही म्हटले आहे.
...तर पुरावेच लागणार नाहीतमी बोललो ते सत्यच आहे. तुम्हीच मी काय म्हणालो ते नीट ऐका. त्यावेळच्या माझ्या पत्रकार परिषदा ऐका. म्हणजे मग तुम्हाला एक-एक कडी जोडता येईल. असे केले तर मी बोललो त्या गोष्टीसाठी दुसऱ्या कोणत्याही पुराव्याची गरजच भासणार नाही. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
फडणवीस यांनी सस्पेन्सही कायम ठेवल्याने राज्यातील राजकारणात आणखी नवनव्या चर्चांना वेग येण्याची शक्यता आहे.