Ajit Pawar On Sharad Pawar ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी काही दिवसातच सुरू होणार आहे, याआधी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जागावाटपासाठी बैठका सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची राज्यात 'जन सन्मान' यात्रा सुरू आहे. दरम्यान, काल बारामती येथील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी अप्रत्यक्ष खासदार शरद पवार यांना टोला लगावला आहे.
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
"मला काही राजकीय भूमिका घ्यावी लागली, ती भूमिका मी साहेबांना सांगूनच घेतली. साहेब पहिल्यांदा हो बोलले नंतर पुन्हा साहेब म्हणाले मला ते योग्य वाटत नाही. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. कारण त्यांच्या नेतृत्वातच आम्ही सगळी पुढं गेलो, असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार शरद पवार यांच्याबाबत केला.
काल उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती येथे डॉक्टरांच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले, पण राजकारणात हे सगळं होत असताना तुम्हाला कधी त्रास झाला नाही, कारण आम्ही परिवार एक होतो.त्यामुळे काही अडचण नव्हती. नंतर मी काही ठिकाणी सुतोवाच केलं होत, ते तुम्ही बघितलं होत. काही डॉक्टरांनी पण मला फोन करून सांगितलं काय तुमच्या मनामध्ये म्हणालो काही नाही बाबा, शेवटी कुठं ना कुठं थांबाव लागतं.जसं आता डॉक्टर राजे थांबलेच आहेत. त्यामुळे तुम्ही पण तुमच्या पेशंटला सांगा काही काळजी करू नका. 1967 पासून काही मिळालं नाही, आता देत आहेत तर आता घ्या मिळालं तेवढं. काहीच सोडू नका. यांना पण इतकी वर्ष मत देत आलोय, आता काय होतय दिलं म्हणून असं तुम्ही तुमच्या पेशंटला सांगा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असं सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. ( Maharashtra Politics )
अजित पवार बारामतीतूनच लढणार
उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का? कुठून लढवणार? याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी पूर्णविराम दिला. मी पक्षाचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून हे अधिकृत सांगतो, की अजित पवार हे बारामती मतदारसंघातूनच उमेदवार असतील. मी पक्षाची पहिली जागा जाहीर करतो, असे पटेल यांनी सांगितले.
बारामतीला नवा आमदार मिळेल, असे विधान अजित पवार यांनी बारामतीतच जाहीर केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. सध्या अजित पवार विविध मतदारसंघांतून लढण्यासंदर्भात आढावा घेत असून शिरूर मतदारसंघातून लढण्याबाबत ते चाचपणी करत असल्याची चर्चा होती. मात्र, या सर्व चर्चांना पटेल यांनी उमेदवारी जाहीर केल्याने पूर्णविराम मिळाला आहे.