पुणे : ‘‘लहान असताना मला औपचारिक शिक्षणामध्ये फारसा रस नव्हता. शाळेत मी विचित्र चेहरे बनवत गुरुजींकडून ५-५ मिनिटांचा ‘ब्रेक’ मागायचो. तेही माझ्या चेहऱ्याकडे पाहून तो द्यायचे. तेव्हापासून कदाचित अभिनयाचे वेड मला होते, असे सांगत अभिनेते, कवी, लेखक पंकज झा यांनी आपला जीवनप्रवास उपस्थितांसमोर मांडला.पुण्यातील दकनी अदब फाउंडेशन आयोजित पाचव्या डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी ‘तुम्हारा मिलना जरुरी था तुम्हारे लिए’ या कॉफी टेबल टॉक कार्यक्रमात अभिनेत्री धनश्री हेबळीकर यांनी झा यांच्याशी संवाद सांधला. डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या आयोजिका मोनिका सिंग, जयराम कुलकर्णी, मनोज ठाकूर, रवींद्र तोमर, युवराज शाह, शाहीर सुरेश वैराळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.झा म्हणाले, आयुष्य असे जगा की तुम्ही जणू अभिनय करताय आणि अभिनय असा करा की जणू सत्यात आयुष्य जगत आहात, असे ओशो यांनी एकदा त्यांच्या शिष्याला सांगितले असल्याचे वाचले आणि हे मला पटले. तेव्हापासून मी ओशो यांची शिकवण जपतो आहे.‘पंचायत’ या वेबसिरीजसोबतच मी केलेली अनेक कामे यामुळेच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असावी. अनेक जण आपल्याशी विनाकारण गोड गोड बोलायला येतात. पण मला माझ्या भोवती अशी गर्दी नको असते म्हणून मी एकटाच खुश असतो.आज सगळे जग अभिनय करत असताना, प्रत्यके घरात अभिनयाचे अंक पार पडत असताना फक्त कलाकारच बदनाम आहेत अशा मिश्कील शब्दांत झा यांनी कलाकारांची पाठराखण केली. आज प्रत्येक घराघरात जेवढा अभिनय होत असतो तेवढा कुठेही होत नाही, असेही झा यांनी सांगितले.तुम्ही चांगले कवी आहात, असे धनश्री हेबळीकर म्हणाल्या असता, आपण जेव्हा जवळून आयुष्य पाहतो तेव्हा आपसूकच कविता सापडते. आज घराघरात अनेक दुःखी लोक आहेत. घराघरांमध्ये फक्त मोठ्या प्रमाणात सामान आहे, मोठमोठ्या गाड्या आणि गाद्या आहेत. आज सगळ्यांकडे गरजेपेक्षा जास्त पैसा आहे. मात्र जेवढ्या मोठ्या गाद्या तेवढी लोकांची झोप मात्र कमी झाली आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे, असे पंकज झा यांनी सांगितले.
विचित्र चेहरे करून गुरूजींना ‘ब्रेक’ मागायचो !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 4:25 PM