माझा दादा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा असे मनोमन वाटते; अजितदादांच्या मातोश्री आशा पवारांची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 12:02 PM2023-11-05T12:02:47+5:302023-11-05T12:03:16+5:30
माझ्यासमोरच मुलाने मुख्यमंत्री व्हावे असे मला मनापासून वाटते लोकांचे त्याच्यावर प्रेम आहे पण बघू काय होते ते
काटेवाडी : माझा दादा मला राज्याच्या मुख्यमंत्री व्हावा असे मनोमन वाटते. आता माझे वय ८६ आहे. त्यामुळे माझ्या देखतच दादाने मुख्यमंत्री व्हावे असे मला वाटते. लोकांचे त्याच्यावर प्रेम आहे. बारामतीकरांचे काटेवाडीकरांचे दादा वर प्रेम आहे. पण बघू पुढे काय होते पाहू, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा काकी पवार यांनी आपली भावना व्यक्त केली.
काटेवाडी येथे रविवारी (ता. ५) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा काकी पवार व पत्नी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी सकाळी सातच्या दरम्यान हजेरी लावली होती. काटेवाडी येथील मतदान केंद्रावर आशा पवार यांनीच प्रथम मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी माध्यमांशी बोलताना पवार म्हणाल्या, पूर्वीची काटेवाडी आणि आत्ताच्या काटेवाडी मध्ये खूप बदल झाला आहे. माझ्या सूनबाईने ग्रामस्थांच्या सहकार्याने हा अमूलाग्र बदल घडवला आहे. दादा उपमुख्यमंत्री कधी व्हावेत असे आपणास वाटते, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता माझ्यासमोरच मुलाने मुख्यमंत्री व्हावे असे मला मनापासून वाटते लोकांचे त्याच्यावर प्रेम आहे पण बघू काय होते ते, पुढचे काय सांगावे असेही आशा पवार यावेळी म्हणाल्या. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत बरी नसल्याने प्रथमच ते ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला हजर राहू शकले नाहीत." मात्र सुनेत्रा पवार यांनी सकाळी सात वाजता मतदान स्थळी हजेरी लावून साडेसातच्या दरम्यान मतदान केले.