लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “उपनगरांमध्ये चांगली कामगिरी करणारी राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराच्या मध्यभागात ढिली का पडते? पेठांमध्येही पक्ष पोहचेल असे काम करा, मला पेठा हव्या आहेत,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे नवे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यावर जबाबदारी दिली असल्याचे समजते.
शहराच्या मध्यवर्ती भागात राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळत नसल्याची अजित पवार यांची खंत जुनीच आहे. पुण्याचा खरा चेहरा पेठा आहेत, तिथे पक्ष नाही म्हणजे काहीतरी चुकते आहे, असे पवार यांना वाटते. तीच खंत त्यांनी जगताप व अन्य काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती मिळाली. तुम्हाला हवी ती मदत करतो, पण या भागात पक्ष वाढेल असे करा, येत्या निवडणुकीत तिथून आपल्याला किमान काही जागा मिळायला हव्यातच, असे त्यांनी जगताप यांना सांगितले.
प्रामुख्याने शरद पवार यांना मानणाऱ्या पण हल्ली फार सक्रिय नसणाऱ्या पेठांमधील कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांची स्वतंत्र बैठक घ्यावी, असे त्यांनी सांगितले आहे. हवे असल्यास या मेळाव्याला पवारसाहेबांना आणण्याचे किंवा सर्व कार्यकर्त्यांची त्यांच्याबरोबर भेट घडवून देण्याचे आश्वासनही अजित पवार यांनी दिल्याचे समजते.
त्याचबरोबर या परिसरातील युवा कार्यकर्त्यांना पक्षाच्या विविध आघाड्यांमध्ये जबाबदारी देणे, त्यांच्या सतत संपर्कात राहणे, त्यांंना पक्षाच्या वतीने सामाजिक कामांमध्ये सक्रिय करणे याकडे लक्ष द्यावे, असे जगताप यांना सूचवण्यात आले आहे. महापालिकेची सलग दोनदा ताब्यात असलेली सत्ता पुन्हा आणायची तर हातावर हात ठेवून बसता येणार नाही. त्यासाठी पूर्णवेळ अध्यक्ष व्हायला हवे असेही पवार यांनी सांगितल्याचे समजते.