मला काहीतरी चांगलं करायचंय, पुतणे म्हणून किती दिवस मते मागू : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 02:22 PM2024-05-09T14:22:55+5:302024-05-09T14:24:57+5:30
मला काहीतरी चांगलं काम करून दाखवायचे असून पुतणे म्हणून मते घ्यायची नाहीत असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेष्ठ नेते शरद पवारांना लगावला आहे....
शेलपिंपळगाव (पुणे) : शरद पवार साहेब आमचे नेते आहेत. मात्र वयाच्या ऐंशीनंतर त्यांनी थांबलं पाहिजे. स्वतः ची तब्बेत सांभाळली पाहिजे. कारण आम्ही कारभार करायला खंबीर आहोत. त्यासाठी आमच्या सारख्या काम करणाऱ्या नेत्यांच्या हातात पक्षाची सूत्रे देऊन पवार साहेबांनी मार्गदर्शन करून आशीर्वाद देणे अपेक्षित होते. परंतु साहेबांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेतला. आता माझं पण वय होतं आलंय. मला काहीतरी चांगलं काम करून दाखवायचे असून पुतणे म्हणून मते घ्यायची नाहीत असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेष्ठ नेते शरद पवारांना लगावला आहे.
केंदूर (ता. शिरूर) येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. याप्रसंगी आमदार मेघना बोर्डीकर, माजी सभापती प्रकाश पवार, भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे, तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, बँकेचे संचालक निवृत्ती गवारी, भाजप महिला नेत्या जयश्री पलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, माजी उपसभापती सविता पऱ्हाड, भाजपा शिरूर तालुका उपाध्यक्ष भगवान शेळके, उद्योग आघाडी अध्यक्ष रवींद्र गायकवाड, सरपंच अमोल थिटे आदिंसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणूक गावकी - भावकीची नसून देशाची निवडणूक आहे. त्यामुळे विरोधक तुम्हाला भावनिक साद घालतील. मात्र आपण आता भावनिक होऊ नका. शरद पवार आमचे पण दैवत आहे. मात्र विकासकामे करायची असतील तर मोदींचे हात बळकट करावे लागणार आहे. केंदूरसह आजूबाजूच्या गावातील पाणीप्रश्न सोडवला जाईल. केंदूर भागात पाहणी करून सोलर प्रकल्प उभारण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. मात्र त्यासाठी आपल्या भागातील खासदार दिल्लीला पाठवावा लागणार आहे.
शरद पवार आमचे नेते...
एकीकडे आदरणीय शरद पवार आमचे नेते आहेत. मात्र वयानुसार त्यांनी थांबलं पाहिजे असे अजित पवार यांनी सांगितले. मात्र मी त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही असाही टोला अजित पवारांनी भर सभेत शरद पवारांना लगावला.
व्यंकटेश साखर कारखाना सुरू मग घोडगंगा बंद कसा पडतो?....
घोडगंगा साखर कारखाना आमदार अशोक पवारांनी काढलेल्या कर्जामुळे बंद पडला आहे. मात्र तो बंद पडण्यामागे माझं नाव घेतलं जाणार असेल तर अजिबात खपवून घेतले जाणार नाही. कारण मी कोणाच्या चहालाही मिंढा नाही. मी आरोप सहन करणार नाही. एकीकडे व्यंकटेश साखर कारखाना सुरळीतपणे चालतो, मग घोडगंगा साखर कारखाना का चालू शकत नाही ? असाही प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला.