पुणे: लहानपणी माझ्यासह पाचही भावंडे पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरून अनाथ अवस्थेत फिरत असताना, ‘ही धैर्यधराची मुलं’ असे खोचक टोमणे लोकांनी मारले, त्याच पुण्यात मी सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या जीवनगौरव पुरस्काराचा प्रमुख पाहुणा आहे; आणि माझ्यासह पाचही भावंडांना भारत सरकारने पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले आहे,अशा भावना ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी सोमवारी व्यक्त केल्या.तसेच त्यातच कोणत्याही परिस्थितीमुळे घाबरून जाऊ नका, कष्ट करत राहिले पाहिजे,असेही त्यांनी सांगितले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हृदयनाथ मंगेशकर बोलत होते.कार्यक्रमात मंगेशकर यांच्या हस्ते ग्रामविकासाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे पोपटराव पवार, बीजांच्या स्थानिक प्रजातींचे जतन करणा-या राहिबाई पोपेरे,ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, भटक्या-विमुक्तांसाठी कार्य करणारे गिरीश प्रभुणे, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यरत शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन आणि जनसेवा फाउंडेशनचे डॉ. विनोद शहा यांना ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू केदार जाधव, प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि युवा नाटककार धर्मकिर्ती सुमंत यांना युवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, प्रभारी कुलसचिव डॉ. पराग काळकर, मित्सुबिशी या जपानी कंपनीचे इसाहिरो निशीमाटो, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदी उपस्थित होते. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले,लतादिदी यांनी आम्हा सर्व भावंडांना उदंड प्रेम दिले. दिदींनी घेतलेले कष्ट हेच माझ्यावर झालेले संस्कार आहेत.तसेच शिक्षणातील आनंद मला माहीत नाही. मात्र,मला गीते नव्हे तर कविता अंतर्मुख करतात. त्यामुळे मी चाली लावण्यासाठी कविता निवडतो.तसेच संत साहित्याला चाल लावताना फारसे कष्ट पडत नाही,कारण त्या शब्दांच्या मागेच सूर उभे असतात..........खडकी शिक्षण संस्था व शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेला व माझ्या कुटुंबाला विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार अर्पण करतो,असे नमूद करून अॅड.एस.के.जैन म्हणाले, संस्थाचलक आणि सेवक यांच्यात मालक-सेवक अशा नजरेतून न पाहिल्यानेच मी शिक्षण क्षेत्रात चांगले काम करू शकलो आणि संस्थांना पुढे नेऊ शकलो.नरेंद्र जाधव म्हणाले,या विद्यापीठाने व पुण्यनगरीने माझे भावविश्व समृद्ध केले. मी इथे रमलो होतो, त्यामुळेच तेव्हा मी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नरपदही नाकारले. या विद्यापीठाने मला जे दिले, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.---------धर्मकिर्ती सुमंत म्हणाले, विद्यापीठात असताना मी विद्यापीठाबाहेरही खूप शिकलो. विद्यापीठ ही समकालीन गोष्टींसाठी विरोध दर्शवण्याची एक सभ्य जागा उरली आहे.मात्र,मुलांना येथे व्यक्त होण्याची संधी मिळतेय ही आनंदाची बाब आहेआपल्याला आता भूजलाचे योग्य व्यवस्थापन करावे लागणार आहे. ते जमले नाही तर भविष्यात देशात मोठे संकट उभे राहण्याचा धोका आहे, कारण देशातील तब्बल ३५० जिल्ह्यांमध्ये पाण्याची गंभीर परिस्थिती आहे,असे पोपटराव पवार यांनी सांगितले.
टोमणे मारलेल्या पुण्यातच मी विद्यापीठाच्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा : पं. हृदयनाथ मंगेशकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 7:18 PM
‘ही धैर्यधराची मुलं’ असे खोचक टोमणे लोकांनी मारले.
ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वर्धापन दिन समारंभ