"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 12:35 AM2024-04-29T00:35:35+5:302024-04-29T00:36:46+5:30
...यावेळी, अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना इशारा वजा सूचना देत, धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वक्तव्याचा संपूर्ण किस्सा जसाच्या तसा सांगितला. तसेच, जनतेला भावनिक न होण्याचे आवाहनही केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभारता सर्वच राजकीय पक्षांकडून जबरदस्त प्रचार सुरू आहे. मात्र सर्वांचे लक्ष आहे ते बारामतीकडे. आज बारामती जिल्ह्यातील शिर्सुफळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका प्रचारसभेत राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांनी जबरदस्त बॅटिंग केली. यावेळी, अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना इशारा वजा सूचना देत, धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वक्तव्याचा संपूर्ण किस्सा जसाच्या तसा सांगितला. तसेच, जनतेला भावनिक न होण्याचे आवाहनही केले.
आपला धरणासंदर्भातील 'तो' किस्सा सांगताना अजित दादा म्हणाले, "मी असंच त्या निंबोडीमध्ये एका बैठकीत, कॅमेरा नव्हता काही नव्हतं, सहज आपल्या भाषेत बोलायला गेलो, काय आता तिथं काय करावं का? धरणात... माझं वाटोळं झालं. परत कानाला खडाच लावला. कॅमेरा असो, नसो, सारखं मेंदूला सांगत असतो, नीट बोलायचं... नीट बोलायचं... नीट बोलायचं... शब्द कुठला चुकीचा जाऊ द्यायचा नाही... जाऊ द्यायचा नाही... जाऊ द्यायचा नाही... मुद्दा ब्रेकिंग न्यूजला द्यायचा नाही... द्यायचा नाही... द्यायचा नाही..."
पुढे बोलताना अजित दादा म्हणाले, "माणूस चुकतो ना, अरे जो काम करतो तोच चुकतो. जो बोलतो... मी बोलतो म्हणून एखादा शब्द गेला. परंतु कायम गेला नही. त्याकरता माझं तुम्हाला सर्वांना सांगणं आहे, आत्ता साहेब उभे नाहीत, मीही उभा नाही. आम्ही दोघेही नाही. त्यामुळे आता तुमच्या घरात 40 वर्षांपूर्वी आलेल्या सूनेला निवडून द्यायचं की, मुलीला द्यायचं, हे ठरवा तुम्ही. त्यामध्ये सुनेला मान असतो. सून लक्ष्मी म्हणून समजतात. अहो तुमच्या आमच्या घरात सून आली की, थोड्या दिवसाने सासू तिच्याच हातात चाव्या देते ना. सर्व तू आता बघ, चूकलं तर ती सुनेला सांगते, हे चूकलंय, हे दुरुस्त कर. आईच्या पोटातून तर कुणीच शिकून येत नाही. मीही नाही आलो. मी 1984 ला भाषणं करायचो, पाय लटलट कापायचे. कुणी तरी सांगायचं तिकडे बघून भाषण कर.. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे भावनिक होऊ नका."
एकाचं कुंकू लावा... माझं तरी लावा नाही तर त्यांचं तरी लावा... -
"काही जण दादा आले की, दादांच्या पुढे पण, हालगी वाजत असती, फटाके वाजत असतात. माझ्याही पुढे चालतात दादांना दिसावे, असे चालतात. दादांची पाठ फीरली आणि आमचे दुसरे आले की, त्यांच्यासोबत. अरे काय चाललंय तुमचं. एकाचं कुंकू लावा. माझं तरी लावा नाही तर त्यांचं तरी लावा. हा काय लावला चाहाटळपणा, हे झाकून राहत नाही," असा इशारा देत दादांनी धरणाचा किस्सा सांगितला.
केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ -
"आज परिस्थिती बदलली आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. जर तुमच्याकडे फक्त राज्याचाच निधी येणार असेल केंद्राचा निधी येणारच नसेल तर विकास कसा होणार. जर विरोधातील खासदार असेल तर निधी मिळत नाही. अनेक मोठ्या प्रकल्पांना मार्गी लावताना केंद्राची मदत घ्यावीच लागते. त्या साठी महायुतीच्या विचाराचा खासदार व्हायला हवा, असे पवार म्हणाले.