"देशाच्या इतिहासातून काँग्रेसचे नाव पुसायला निघालेल्या भाजपला उत्तर देणार", नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 06:17 PM2021-08-04T18:17:01+5:302021-08-04T18:24:44+5:30
व्यर्थ न हो बलिदान मोहिमेत सक्रिय सहभाग द्या, असे आवाहन
पुणे : भारतीय जनता पार्टी देशाच्या इतिहासातून काँग्रेसचे नाव पुसायला निघाली आहे. त्यामुळेच राज्यपाल पदावरील व्यक्तीसुद्धा पंडित नेहरू यांच्याबाबत काहीही बरळते. या सगळ्याला ऊत्तर देणे गरजेचे आहे. व्यर्थ न हो बलिदान मोहिमेतून ते देता येईल. असे समजून त्यात सक्रिय सहभाग द्या. असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या मंत्र्यांंना केले.
नव्या पिढीला स्वातंत्र्य चळवळ व काँग्रेस यांचा संबध समजावून देण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे उत्तम निमित्त आहे, त्यामुळे हे पक्षाचेच काम आहे. असेही त्यांनी सांगितले.
मुंबईत मंगळवारी रात्री पटोले यांनी पक्षाच्या सर्व मंत्र्यांची विशष बैठक घेतली. नव्या पिढीलाही या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कोण घरात होते. व कोण बाहेर होते याची माहिती मिळेल. वर्षभर सुरू असणाऱ्या या मोहिमेची आपापल्या मतदारसंघातील जिल्हा तालुक्यात लोकांना माहिती करून द्या, स्वतः त्यात सहभागी व्हा असे आवाहन पटोले यांनी केले.
मोहिमेचे राज्य समन्वयक अँड. अभय छाजेड व विनायक देशमुख यांनी या बैठकीत जिल्हा व तालुकानिहाय कार्यक्रमाची माहिती दिली. नांदेड व सभोवतालच्या चार जिल्ह्यांचा एकत्रित मोठा कार्यक्रम घेणार असल्याचे यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर केले.