शिरूर : शिरूर तालुक्यातील रामलिंग परिसरातील तरुणाच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी एका संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे शिरूर विद्यालय परिसरातील रोडरोमियोंचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्रणव अशोक उबाळे (रा. कॉलनी, रामलिंग रोड, शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार आत्महत्या करणारी अल्पवयीन मुलगी गोलेगाव येथे तिच्या मामाच्या गावी राहून शिरूर शहरात शिक्षण घेत आहे. ती महाविद्यालयात जात असताना प्रणव उबाळे हा वारंवार भेटून त्याच्याशी बोलण्याबाबत दबाव तिच्यावर टाकत होता. मुलगी भेटण्यास व बोलण्यास नकार देत असल्याने प्रणव याने तू शिक्षण घेत असलेल्या शाळेत तसेच शाळेबाहेर तुझी बदनामी करेन अशी धमकी तिला दिली. हा त्रास असह्य झाल्याने तिने मंगळवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे करत आहेत.