बारामती : किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी मी स्वत: लस घेतलेली नाही आणि घेणारही नाही. असे नाशिकमध्ये एका किर्तनात बोलताना वक्तव्य केले आहे. याबाबत आरोग्यमंत्रीराजेश टोपे हे इंदुरीकर यांना नक्कीच भेटणार असल्याचे सांगितले आहे. बारामतीत बुधवारी ते पत्रकारांशी बोलत होते.
टोपे म्हणाले, निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना शास्त्रीय दृष्टीकोनातून, अध्यात्मिक दृष्टीकोनातून महाराजांकडे ज्ञान आहे. मी स्वत: वैज्ञानिक दृष्टीकोनातून लसीचे महत्त्व पटवून देईन. किर्तनकार देशमुख ज्या पद्धतीने समाजाचे प्रबोधन करतात. समाजाला किर्तनाच्या माध्यमातून संदेश देतात, तो त्यांच्या स्टाईलमुळे लोकांना भावतो. त्यामुळे नागरिक त्यांच्या किर्तनाला मोठी गर्दी करतात. त्यांनी लसीसंबंधी असे वक्तव्य केले असेल तर मी त्यांच्याशी नक्कीच भेटून बोलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
''गेल्या दोन वर्षांपासून कीर्तन आणि प्रबोधन बंद असताना त्यांचा समाजातील जास्त संपर्क आला नाही. त्यामुळे ते बाधित झाले नाहीत. महाराजांनी स्वत:ला जरुर प्रोटेक्ट केलेले असेल किंवा मास्क, सोशल डिस्टन्सींग अशी काळजी ते घेत असतील. परंतु प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे. जागतिक स्तरावर कोविड लसीला महत्त्व आहे. लस ही कवचकुंडल आहे. लस घेतल्यानंतर कोरोना संसर्ग होत नाही असे नाही, परंतु लस घेतल्यावर रुग्ण गंभीर स्थितीत पोहोचत नाही, त्याला ऑक्सिजनची गरज भासत नाही, आयसीयूमध्ये दाखल करावे लागत नाही. लसीमुळे लसीमुळे शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण होतात. त्यामुळे लस घेणे गरजेचे आहे. काही समाजामध्ये लसीबाबत गैरसमज आहेत. त्यांच्या धर्मगुरुंशी आम्ही बोलून लसीची उपयुक्तता पटवून दिली आहे. इंदूरीकरांनाही मी लक्ष घालून यासंबंधी निश्चित सांगणार असल्याचे टोपे म्हणाले आहेत.''
आमचे आकडे नेहमीच बिनचूकच; दिशाभूल करण्याचा विषयच नाही
''केंद्र व राज्याच्या आकडेवारीत जर काही फरक असल्यास जुळवणी करण्याचे काम केले जाईल. ‘को विन’ अॅपवर अत्यंत पारदर्शीपणे अपडेटेड डेटा असतो. त्या ‘डेटा’च्या अनुषंगानेच आकडेवारी तयार होते. कोविडच्या काळात आकड्यांबाबत कधीही चुकीची माहिती आम्ही दिलेली नाही. रुग्णांचे आकडे असोत कि मृत्यूचे असोत की आता लसीकरणाचे असो. आमचे आकडे नेहमीच बिनचूकच असतात. त्यामुळे दिशाभूल करण्याचा विषय राहतच नाही. पारदर्शकता आणि प्रामाणिकता हा आमचा मूल सिद्धांत राहिला असल्याचे टोपे यांनी सांगितले.''