धनकवडी (पुणे) : राज्याचे विधानसभा निवडणूक येत्या २० नोव्हेंबरला येऊन ठेपली आहे. तर लगेच २ दिवसात निकाल लागणार आहे. त्यामुळे सर्व पक्षांकडून निवडणुकीच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. पुण्यात विधानसभेच्या अनुषंगाने उमेदवारीबाबत रस्सीखेच दिसून येत आहे. पर्वतीविधानसभा मतदार संघातून आमदार माधुरी मिसाळ इच्छुक आहेत. अशातच माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी मिसाळ यांच्या विरोधात दंड थोपटले असून, मी ‘लढणार आणि जिंकणारच’ असा नारा दिल्याने भाजपमध्ये रस्सीखेच सुरु झाल्याचे दिसून आले आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघातून यंदा ‘विधानसभेत’ जाण्यासाठी जोरदार तयारी करणारे भाजपचे महापालिकेतील माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांना राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळ देऊन त्यांच्या विधीमंडळात जाण्याच्या आकांक्षांना ब्रेक लागल्याच्या बातम्या समाज माध्यमातून व्हायरस झाल्या होत्या, याच पार्श्वभूमीवर भिमाले यांनी पत्रकार परिषदेत घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
भिमाले म्हणाले या संदर्भात पक्षाकडून मला कोणत्याही प्रकारची अधिकृत पत्र मिळाले नाही, फोन आला नाही की मेल आला नाही, आपल्या माध्यमातून मला महामंडळ मिळण्याची माहिती मिळत आहे. परंतु पक्षाकडे मी विधानसभेची मागणी केली आहे, आणि त्यावर मी ठाम आहे. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या पर्वती विधानभा मतदारसंघातील धुसफूस या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली असून पक्षश्रेष्ठी यातून कसा मार्ग काढणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
मी लढणार आणि जिंकणारच
मी मागील ३० वर्षांपासून राजकीय जीवनात काम करत आहे. आजवर पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी चांगल्या प्रकारे पाडत आलो आहे. त्यामुळे मार्केट यार्ड परिसरात तीन वेळा नगरसेवक आणि पुणे महापालिकेमध्ये सभागृह नेता म्हणून काम केले आहे. त्या माध्यमातून पर्वती विधानसभा मतदारसंघात अनेक प्रकल्प आणले आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे प्रचंड मतांनी निवडून आले. त्यामध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचे काम केले आहे. आजवर झालेल्या विधानसभा निवडणुकांत पक्षश्रेष्ठीं कडे निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. त्या प्रत्येक वेळी थांबण्याचे आदेश दिले. मात्र यंदा मला वरिष्ठ निवडणूक लढविण्याची संधी देतील. म्हणूनच मी लढणार आणि जिंकणार असा निर्धार केला आहे.