बारामती (पुणे) : राज्यसभेवर निवड झाल्यानंतर मी पहिल्यांदाच बारामतीत आले. मला माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सगळ्याच मतदारांचे जनतेचे आभार मानायचे होते. त्यानिमित्ताने मला त्यांना भेटायचं होतं. यासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना भेटून मला आनंद झाला, त्यांच्यामुळेच आज मी इथे आहे, त्या सर्वांचे खूप आभार, अशा शब्दांत खासदार सुनेत्रा पवार यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर नुकतीच नियुक्ती झाली आहे. राज्यसभा खासदार झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच बारामती दाैऱ्यावर उपस्थित होत्या. गुरुवारी (दि. २०) पवार यांनी सहयोग सोसायटीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुनेत्रा पवार यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सुनेत्रा पवार यांनी याबद्दल आपल्याला काहीही कल्पना नसल्याचे सांगितले. दरम्यान, खासदार सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत सत्कारासाठी समर्थक आणि पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती.
लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर
आपली पुढील वाटचाल कशी असेल, याबद्दल सुनेत्रा पवारांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, माझी आताशी सुरुवात आहे. जनतेच्या ज्या काही अडचणी असतील, मागण्या असतील त्यांची सेवा करण्याची संधी मला त्यांनी दिलेली आहे. त्यांच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. मला जे योगदान देता येईल, ते मी त्यांच्यासाठी देण्याचा प्रयत्न करेन.