पुणे : प्रशासनाने कितीही ताकद लावली तरी मी भीमा कोरेगावला जाणारच आहे. आम्हाला तर येथूनच पायी जाण्याची इच्छा आहे. 2019 साली हे सरकार उलथवून टाकू, असा निर्धार चंद्रशेखर आझाद यांनी व्यक्त केला. मुंबईवरून पुण्याला आल्यावर आझाद यांनी पुणे स्टेशन येथील आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.आझाद म्हणाले, प्रशासनाला सभेची परवानगी मागितली होती, परंतु काल परवानगी नाकारण्यात आली. आम्ही या बाबतीत कोर्टात गेले आहोत. उद्या कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागला तर आम्ही नक्कीच उद्या सभा घेऊ. 1 तारखेला मी कोरेगाव-भीमाला जाणारच आहे. सरकारने कितीही प्रयत्न केले तरी मी जाणार आहे. मी नाही तर देशातील करोडो लोक तिथे जातील. ज्यांनी मागच्या वर्षी दंगल घडवली त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाहीत आणि मला तिथे जाण्यापासून रोखण्यात येत आहे. मी तर सर्वांना आव्हान करतो की 1 तारखेला सर्वांनी तेथे यावे. मी बाबासाहेबांना मानतो आणि संविधान हा माझा धर्मग्रंथ आहे. त्यामुळे भीमा-कोरेगावला जाणं हा माझा अधिकार आहे. मोदींच्या हत्येच्या कटाच पत्र मिळालं असं सांगण्यात येतंय हा एक राजकीय स्टंट आहे. एल्गार परिषदेतील ज्या लोकांना अटक केलीये ते निर्दोष लोक आहेत, त्यांना जाणूनबुजून अटक करण्यात आली आहे. मोदींच्या जीवाला नाहीतर इथल्या माणुसकीला धोका निर्माण झाला आहे. इथल्या बुद्ध धर्माला धोका आहे.मला चैत्यभूमीला जाण्यापासून रोखण्यात आले. एका मुलाला त्याच्या वडिलांच्या समाधीकडे जाण्यापासून रोखण्यात आले. सरकारला लाज वाटली पाहिजे, असं करताना वातावरण यांना खराब करायचं आहे. कारण हे दंगली घडवून राजकारण करतात. या दंगलीच्या राजकारणाचा आम्ही आता अंत करणार आहोत.
कितीही ताकद लावा कोरेगाव-भीमाला जाणारच: चंद्रशेखर आझाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 11:01 PM